जि. पं. ला तीन, ग्रा. पं. ला दोन, बेंगळुरात वितरण
बेळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) 2023-24 साठी बेळगाव जिल्ह्याला अमृत सरोवर जिल्हा पुरस्कारासह एकूण पाच पुरस्कार लाभले आहेत. पुरस्कारांचे वितरण बेंगळूर येथील बी. आर. आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या आंबेडकर भवनात बुधवारी करण्यात आले. विधानपरिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी व ग्रामीण विकास-पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, योजना संचालक रवि बंगरेप्पनवर यांनी पुरस्कारांचा स्वीकार केला. यावेळी बेळगाव जि. पं. चे बसवराजू, प्रमोदा घोडेकर हेही उपस्थित होते.
जिल्ह्यातील कृषी व जलानयन, तसेच वनखात्यालाही पुरस्कार मिळाला आहे. जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, सामाजिक वनीकरण खात्याचे उपसंरक्षण अधिकारी के. एस. गोरवर यांनी पुरस्कारांचा स्वीकार केला. कोटबागी (ता. हुक्केरी) ग्रा. पं. ला सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रा. पं. अध्यक्ष बसवराज गोसुरी व विकास अधिकारी निरंजन कुरबेट यांनी पुरस्कार स्वीकारला. उत्तम श्रमजीवी (कायक बंधू) पुरस्कार अनिता बेळगावकर, ता. पं. चे कार्यकारी अधिकारी रमेश हेगडे यांनी स्वीकारला. यावेळी आमदार रिझवान अर्षद, शरद बच्चेगौडा, पंचायतराज खात्याच्या अप्पर मुख्य सचिव उमा महादेवन, ग्रामीण विकास-पंचायतराज अप्पर मुख्य सचिव अंजुम परवेझ, ग्रामीण विकास आयुक्त पवनकुमार मलकाटी आदी उपस्थित होते.









