कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेची कारवाई, 254 खेळाडूंना फटका
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने बहिष्कार घातल्यानंतर कर्नाटक फुटबॉल संघटनेने याला जाब विचारत सदर कमिटीची शहानिशा करण्यासाठी कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सदर बेळगाव जिल्हा फुटबॉल कमिटी बरखास्त केली आहे. दरम्यान, 12 संघातील 254 खेळाडूंना याचा फटका बसणार आहे. परिणामी कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार हॅरिश एन.ए. यांनी बैठकीत चौकशीचे आदेश देवून ही स्पर्धा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने 28 मे पासून वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये 20 संघांनी सहभाग घेतला. दरम्यान या 20 संघांना चार गटात विभागण्यात आले. मात्र 20 संघांपैकी 12 संघांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातल्याने मोठा गोंधळ माजला. यापैकी काही संघ स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र अंतर्गत दबावामुळे त्यांनीही माघार घेतली. बहिष्कार घातलेल्या संघांना पाठिंबा दर्शविणाऱ्यांनी कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेकडे तक्रार केली. तातडीने कर्नाटक फुटबॉल संघटनेच्या कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीत कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार हॅरिश एन.ए. यांनी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने घेतलेले निर्णय व आर्थिक व्यवहार याबद्दल कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि कार्यकारी मंडळ सध्या निलंबित करीत आहोत. पण सुरू असलेली साखळी फुटबॉल स्पर्धा चालु असून ही स्पर्धा सुरुच राहील. ज्या क्लबने स्पर्धेवर बहिष्कार घातला आहे त्यांना आम्ही निलंबित करीत असून त्यांचे सदस्यत्व कायमस्वरुपी राहील. वरील बाबीबद्दल एक अॅड-हॉक कमिटी स्थापन करुन यामध्ये क्लब आणि संघटनेचे सदस्य असतील. यांच्या देखरेखाली स्पर्धा पार पडेल. स्पर्धेनंतर बेंगळूर येथील कमिटी संघटनेचे आर्थिक व्यवहार व जमाखर्चाचा हिशोब पाहतील आणि त्याची शहानिशा करेल. यामध्ये दोषी आढळल्यास पुन्हा निवडणूक घेतली जाईल. दरम्यान या बैठकीत बँकांचे सर्व व्यवहार स्थगित करण्यात आल्याची माहिती हॅरिश यांनी दिली.
इंडियन फुटबॉल फेडरेशन व कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या नियमानुसार राज्यात, जिल्ह्यात कोणतीही स्पर्धा भरविली जात असेल तर संबंधित फुटबॉल संघटनेच्या स्पर्धा आयोजकांनी मान्यता घेणे गरजेचे आहे. स्पर्धेवेळी पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय उपचार, समर्थकांच्यात वादावादी अथवा भांडणे न होणे याची काळजीसह इतर बाबतीत जबाबदार कोण? यासाठी स्थानिक संघटनेची परवानगी घेणे गरजेचे असते. यापुढेही ती घेणे गरजेचे आहे, असे हॅरिश यांनी सदर बैठकीत स्पष्ट केले. ते म्हणाले, सध्या साखळी स्पर्धा सुरू आहे. ज्या 8 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे ती तशीच सुरू राहिल. पण बहिष्कार घातलेल्या 12 संघांना सदर साखळी स्पर्धेत खेळण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका खेळाडूंना बसला आहे. या बैठकीत कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राजकारण नको, प्रोत्साहन हवे : आमदार हॅरिश एन.ए.
सध्या बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेत गोंधळ माजला आहे. त्यामुळे खेळाडूंना त्याचा फटका बसत आहे. दरम्यान स्पर्धा भरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. संघटनेने भरविलेल्या स्पर्धेवर बहिष्कार टाकून स्पर्धा थांबविण्याचा प्रयत्न हा अक्षम्य आहे. खेळात राजकारण न आणता खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. दरम्यान खेळाडूंचे भविष्य अंधारात आणण्याचा हा प्रकार थांबवून ही स्पर्धा कायम ठेवावी.









