पर्यटकांची सोय : शक्तीअंतर्गत महिलांचा मोफत प्रवास
बेळगाव : पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव-धर्मस्थळ मार्गावर विशेष बस सुरू करण्यात आली आहे. यात्रा-जत्रा आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. याची दखल घेऊन परिवहनने बेळगाव-धर्मस्थळ मार्गावर अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 9.05 वा. ही बस सुटून रात्री 8.35 वा. धर्मस्थळ पोहोचणार आहे. सायंकाळी धर्मस्थळ येथून 6.30 वा. बस सुटून सकाळी 7 वा. बेळगाव येथे पोहोचणार आहे. बेळगाव येथून सुटणारी बस धारवाड, हुबळी, यल्लापूर, कुमठा, भटकळ, उडुपीमार्गे धर्मस्थळला पोहोचणार आहे. nwkrtc.karanataka.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट उपलब्ध केले आहे. बस स्थानकात आगाऊ बुकींग सेवाही उपलब्ध आहे. शक्ती योजनेंतर्गत बेळगाव-धर्मस्थळ महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या बससेवेला महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. या योजनेमुळे सर्वच बसेसना गर्दी होत आहे. त्यामुळे विशेष बससेवेलाही वाढता प्रतिसाद पाहायला मिळणार आहे.









