निजामुद्दीन एक्स्प्रेस 9 तास उशिराने तर विमान फेऱ्याही विलंबाने
बेळगाव : दिल्लीतील खराब हवामानाचा फटका बेळगावमधील विमान तसेच रेल्वे प्रवाशांनाही बसला आहे. दिल्लीहून बेळगावला येणारे विमान मागील दोन दिवसांपासून उशिराने दाखल झाले तर निजामुद्दीन एक्स्प्रेस तब्बल 9 तास उशिराने धावत होती. त्यामुळे खराब हवामानाचा फटका बेळगावमधील प्रवाशांना बसला. मागील दोन दिवसांपासून दिल्ली येथे कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे विमान लँडिंग व टेकऑफ होताना अनेक अडचणी येत होत्या. दृष्यमानता नसल्याने विमान उतरताना धावपट्टी मिळत नसल्याने काही विमाने दिल्लीऐवजी मुंबई येथे उतरावी लागली. रविवारी दिल्लीहून बेळगावला येणारे विमान तीन ते चार तास उशिराने बेळगावमध्ये आले. सोमवारीही सकाळी 11 वाजता विमान बेळगावला आले. दिल्ली विमानतळावर धुक्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे सकाळच्या वेळेत होणारी उ•ाणे विलंबाने होत आहेत.
मंगळवारी विमान वेळेत दाखल
दररोज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी दिल्ली येथून विमान बेळगावच्या दिशेने निघते. ते सकाळी 8.50 वाजता बेळगावला पोहोचते. परंतु कमी दृष्यमानतेमुळे रविवार व सोमवारी विमान उशिराने दाखल झाले. परंतु मंगळवार दि. 16 रोजी विमान वेळेत दाखल झाले. एकीकडे विमानांच्या वेळेमुळे गोंधळ निर्माण झाला असताना बेळगावचे विमान वेळेत दाखल झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
निजामुद्दीन एक्स्प्रेस 9 तास उशिरा
दिल्ली येथील थंडी, त्याचबरोबर ठिकठिकाणी रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हजरत निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस 9 तास उशिराने मंगळवारी धावत होती. सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता दाखल होणारी एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी 10.30 वाजता बेळगावमध्ये दाखल झाली. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत असली तरी अपरिहार्य कारणामुळे विलंब झाल्याचे कारण नैर्त्रुत्य रेल्वेने दिले.
प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे
दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीमुळे विमान तसेच रेल्वेसेवेला मोठा फटका बसला. अनेक मार्गांवरील एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही एक्स्प्रेस उशिराने धावत आहेत. प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करून प्रवास करावा.
– डॉ. मंजुनाथ कनमाडी (मुख्य जनसंपर्क अधिकारी नैर्त्रुत्य रेल्वे)









