गतवर्षीच्या तुलनेत कचरा वर्गीकरणाचे काम उत्तम : दरमहा आठ ते दहा लाखाची बचत
बेळगाव : केंद्र सरकारच्यावतीने 2024-25 सालासाठी करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण परिक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. देशात इंदोर शहराने पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर बेळगाव शहर 72 व्या क्रमांकावर आहे. 2023-24 च्या सर्वेक्षणात बेळगाव शहर 198 व्या स्थानी होते. गतवर्षीच्या तुलनेत कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करण्यात आल्याने देशात 72 वे स्थान गाठण्यात बेळगाव मनपाला यश आले आहे. दरवर्षी केंद्र सरकारतर्फे देशातील सर्व शहरांच्या स्वच्छतेसंदर्भात सर्व्हेक्षण राबविले जाते. गतवर्षी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात बेळगाव महापालिका 198 स्थानी होती.
मनपा आयुक्त म्हणून शुभा बी. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून विशेष करून कचरा व्यवस्थापनावर त्यांनी अधिक भर दिला आहे. कचऱ्याची वेळेत उचल करण्यासह विल्हेवाट लावण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी कचऱ्याचे वर्गीकरण न करताच घंटागाडीकडे किंवा कचराकुंडीत एकत्रित कचरा टाकला जात होता. त्यामुळे कचऱ्याच्या वर्गीकरणावर महापालिकेला अधिक खर्च करावा लागत होता. ओला, सुका आणि प्लॉस्टिकच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याने महापालिकेची दरमहा आठ ते दहा लाख रुपयांची बचत होत आहे.
ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न
शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न सुरू आहेत. 2024-25 सालासाठी करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणावेळी बेळगाव महापालिकेकडून कचरा वर्गीकरणाचे काम 80 टक्के होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे, बाजारपेठ भाग, पिण्याच्या पाण्याचे प्लॉस्टीक बॉटल, रहिवासी परिसर, घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करणे व्यवस्थितरित्या होत असल्याचे स्वच्छ सर्वेक्षणाच्यावेळी दिसून आले आहे. अलिकडेच नुकताच स्वच्छ सर्वेक्षणात अहवाल जाहीर झाला असून देशात इंदोर शहराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर 198 व्या स्थानी बेळगाव शहराने यंदा 72 स्थानी मजल मारली आहे. त्यामुळे ही बेळगाव महापालिकेसाठी कौतुकास्पद बाब आहे. कचऱ्याचे वर्गीकरण अद्याप 33 टक्के होणे बाकी आहे. ते व्यवस्थितरित्या झाल्यास पुढीलवर्षी बेळगाव महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात आणखी पुढे जाईल, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात चांगली कामगिरी केलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचा दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.









