अवजड वाहतूक करणारा ट्रक खड्ड्यात अडकल्याने रस्त्याच्या दुतर्फा पाच-पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
वार्ताहर / कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यावरील वाहतूक जीवघेण्या खड्यांमुळे कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वीच वर्तविण्यात आली होती. अखेर ती शक्यता खरी ठरली आहे. गुरुवारी चोर्ला रस्त्यावरील वाहतूक एक-दोन तास नव्हे तर तब्बल पाच तास ठप्प झाली होती. अवजड वाहतूक करणारा ट्रक खड्ड्यात अडकल्याने रस्त्याच्या दुतर्फा पाच-पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यावरील जीवघेण्या खड्यांमुळे वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होऊ शकते. चोर्ला रस्ता म्हणजे वाहनधारकांना मृत्यूचा सापळाच, अशा पद्धतीचे वृत्त मंगळवारी तरुण भारतमधून प्रसिद्ध करण्यात आले होते. कणकुंबीपासून पाच किलोमीटर अंतरावरील डेल्टा हॉटेलजवळ एका भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये अवजड वाहतूक करणारा ट्रक अडकला. वाहनचालकाने खड्ड्यातून ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ट्रकची एक्सल तुटून पडली. सदर ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे बेळगाव-पणजी अशी पाच तास वाहतूक ठप्प झाली होती.

यापूर्वी अनेकवेळा तरुण भारतमधून या रस्त्याच्या अवस्थेबद्दल आवाज उठविण्यात आला. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मंगळवारी पुन्हा एकदा रस्त्यासंदर्भात आवाज उठविण्यात आल्यानंतर बुधवारपासून काही प्रमाणात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जेसीबी व एका टिप्परच्या साहाय्याने खड्यांमध्ये काही ठिकाणी खडी तर काही ठिकाणी माती ओतून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. केवळ माती टाकून दुरुस्तीचे नाटक करणाऱ्या प्रशासनाला आता दणका दाखविल्याशिवाय पर्याय राहिला नाही, अशा प्रतिक्रिया कणकुंबी भागातील वाहनधारक व प्रवाशीवर्गातून व्यक्त होत आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांपासून चोर्ला रस्ता वाहनधारकांना अतिशय त्रासदायक बनलेला आहे. अशा अवस्थेत गेल्या दोन-चार वर्षांमध्ये रस्त्याची साधी दुरुस्तीदेखील करण्यात आली नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रणकुंडये क्रॉसपासून हाती घेण्यात आले होते. त्यासाठी पावणेतीन कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केला होता. त्यानुसार रणकुंडये ते चिखले क्रॉसपर्यंत मोठी दुरुस्ती करण्यात आली होती.
प्रवाशांचे आतोनात हाल
चिखले क्रॉसपासून चोर्लापर्यंतच्या रस्त्याची घाईगडबडीत दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळेच अवघ्या महिनाभरात हा रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने मोठ-मोठ्या खड्यांनी पुन्हा उग्र रूप धारण केले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून या रस्त्यावर दररोज वाहनांच्या अपघाताची संख्या वाढत असून दोन दिवसांत पाच ते सहा ठिकाणी वाहने अडकून पडली. गुरुवारी चक्क पाच तास वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले. तेव्हा प्रशासनाला आता तरी जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीचे नाटक न करता आठ दिवसांत चोर्लापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती झाली झाली नाही तर कणकुंबी येथे रास्तारोको आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा पारवाड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे व कणकुंबी भागातील नागरिकांनी दिला आहे.









