कर्नाटकातील काँग्रेस सरकार सामान्य जनतेसाठी बजेटद्वारे पायाभूत सुविधेविना केवळ गॅरंटी योजनांना प्राधान्य देऊन जनतेची दिशाभूल करीत आहे. कर्नाटक विधिमंडळाचे सभापती काँग्रेस पक्षाचे एजेंट या प्रमाणे वागत असल्याचे तीव्र आरोप करत आज बेळगाव शहरामध्ये भाजप महानगर आणि ग्रामीण जिल्ह्याच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकामध्ये जमलेल्या भाजपचे आजी-माजी आमदार, नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेतील भाजप सदस्यांचे निलंबन, दूध दरवाढ, गोहत्या बंदी, वीज दरवाढ, धर्मांतर बंदी, एपीएमसी कायदा रद्द करणे याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. राज्यातील काँग्रेस सरकार हिंदू समर्थक कायदा मागे घेण्याबरोबर शेतकऱ्यांचे अनुदान बंद केले आहे. यंदाच्या बजेटमध्ये केवळ गॅरंटी योजनांना प्राधान्य देण्यात आले असून या गॅरंटी योजनेबद्दल जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या गावांमध्ये अद्याप बससेवा आणि रेशन दुकानेच नाहीत. तिथे गॅरंटी योजनांचा काय लाभ ? आधी पायाभूत सुविधा पुरवा. त्यानंतरच आपल्या गॅरंटी योजना जारी करा असा रोषपूर्ण आग्रह करण्यात आला.
काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी धोरण अवलंबत आहे. गॅरंटी योजना जनतेसमोर ठेवून त्यांची दिशाभूल करीत आहे. एका हाताने पैशाचे आमिष दाखवून दुसऱ्याहाताने जनतेची लूटमार चालू आहे. सभापतींचे पद हे निष्पक्ष असते मात्र कर्नाटक विधिमंडळाचे सभापती काँग्रेस पक्षाचे एजेंट असल्याप्रमाणे वागत आहेत. भाजपच्या सदस्यांना निलंबित करणे हे नियमबाह्य असून चुकीचे आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळत चालल्याचा गंभीर आरोप या वेळी करण्यात आला.
या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









