92 टक्के ई-केवायसी पूर्ण : 50 हजार लाभार्थी प्रलंबित
बेळगाव : शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य आहे. ई-केवायसी प्रक्रियेत बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे, अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे. किसान सन्मान योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याला ई-केवायसी करणे आवश्यक आहे. या ई-केवायसीच्या कामात जिल्हा प्रथम क्रमाकांवर आहे. राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये केवळ 50 टक्केच ई-केवायसीचे काम झाले आहे. तर बेळगाव जिल्ह्यातील 5.76 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली आहे. ई-गव्हर्नस, ऑडिओ अॅपद्वारे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यात अधिकारी यशस्वी झाले आहेत. हे अॅप एकाचवेळी 15 हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करते. कृषी खात्याच्या कार्यालयात एका दिवसात अॅपच्या माध्यमातून 1.35 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यात आली आहे. स्वत:च्या मोबाईलवरून किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन ई-केवायसी करता येते.
तीन टप्प्यात सहा हजार रुपये
किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये दिले जातात. यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. मात्र काही लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने पैसे जमा झाले नाहीत. बेळगाव जिल्ह्यातील 50 हजार लाभार्थ्यांची अद्याप ई-केवायसी करणे शिल्लक आहे. ई-गव्हर्नस, ऑडिओ अॅपद्वारे जिल्ह्यातील 1 लाख लाभार्थ्यांनी स्वत:च्या मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी केली आहे. किसान सन्मान योजनेसाठी शेतकरी स्वत:च्या मोबाईलवरून ई-केवायसी करू शकतात. प्लेस्टोअर अॅपमध्ये पीएम किसान ई-केवायसी टाईप करून पुढील कार्यवाही करून ई-केवायसी करता येते.
पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ई-केवायसी आवश्यक आहे. जिल्ह्यात ई-केवायसीचे काम 92 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे ई-केवायसी केले जात आहे. शिवाय पुढील हप्तादेखील लवकरच शेतकऱ्यांच्या नावावर जमा केला जाणार आहे.
शिवनगौडा पाटील (कृषी खाते सहसंचालक)









