265 कोटी रुपयांच्या निविदा : देशातील नामांकित सात कंपन्यांचा प्रतिसाद : कंत्राटदार कंपनीला दोन वर्षांचा कालावधी
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. नव्या टर्मिनल बिल्डींगसह इतर सुविधा या नव्या विमानतळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी विमानतळ प्राधिकरणाने नोव्हेंबर महिन्यात निविदा मागविल्या होत्या. देशातील नामांकित अशा सात कंपन्यांनी निविदा भरल्या असून यापैकी कोणत्या कंपनीला कंत्राट मिळते, हे पुढील दोन महिन्यांत स्पष्ट होणार आहे. बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर बेळगाव विमानतळ असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढता आहे. सध्या विमानतळावर 3,600 चौरस मीटर क्षेत्रफळाचे टर्मिनल असून एकाचवेळी 300 प्रवासी प्रवास करतील, अशी बैठक व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, प्रवाशांची संख्या वाढत असल्याने भविष्यात मोठ्या टर्मिनलची आवश्यकता भासणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी परवानगी दिली असून एकाचवेळी 1200 प्रवासी प्रवास करतील, अशी व्यवस्था नव्या टर्मिनलमध्ये केली जाणार आहे. एकाचवेळी दोन बोईंग विमाने विमानतळावर आल्यास प्रवाशांचा कोणताही गोंधळ होणार नाही, यासाठीची ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
टर्मिनल बिल्डींगसह इतर बांधकाम करावे लागणार
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 265 कोटी 4 लाख रुपयांच्या निविदा विमानतळ प्राधिकरणाने नोव्हेंबर 2023 मध्ये मागवल्या होत्या. कंत्राटदार कंपनीला दोन वर्षांचा कालावधी दिला जाणार असून त्याकाळात टर्मिनल बिल्डींगसह इतर बांधकाम करावे लागणार आहे. एकूण सात कंपन्यांनी निविदा भरल्या असून यापैकी एका कंपनीला विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम दिले जाणार आहे.
निविदा भरलेल्या कंपन्या…
बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सात कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. यामध्ये बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, सीएस कन्स्ट्रक्शन लिमिटेड, गिरीधरीलाल कन्स्ट्रक्शन प्रा. लि., हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि., केएमव्ही प्रा. लि., केपीसी प्रा. लि., रेनाटस प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपन्यांनी बेळगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी उत्सुकता दर्शविली आहे.









