नागनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन
वार्ताहर /उचगाव
बेकिनकेरे गावाचे जे प्रश्न आहेत ते सर्व सोडवण्यासाठी मी पूर्णत: प्रयत्न करणार आहे. तसेच आतापर्यंत रेंगाळलेला धरणाचा प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, मारुती खादरवाडकर, अरुण गावडे, मल्लाप्पा गावडे, गावडोजी गावडे, नागेश बाळेकुंद्रीसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रथम नागनाथ मंदिरांमध्ये लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी दिलेल्या नागनाथ देवाच्या मुखवट्याची पूजा, अभिषेक करण्यात आला. तसेच विविध कार्यक्रमांचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार केला. तसेच नागनाथ देवस्थान कमिटी, एसडीएमसी मराठी शाळा कमिटी, खादरवाडकर परिवार, नागनाथ हायस्कूलतर्फेही शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चलवेनट्टी येथील महिलांचे हरिपाठ, सद्गुरु वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन शाखा बेळगावतर्फे प्रवचन, पोवाड्यांचा कार्यक्रम, भावगीतांचा कार्यक्रम, हास्यजत्रा असे विविध कार्यक्रम झाले. वर्धापन दिनाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत गजानन मोरे यांनी केले. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले. नामदेव गावडे यांनी आभार मानले.









