भाग : 2
लहानपणी असा हा सुखाच्या आणि दु:खाच्या हिंदोळ्यावर बसलेला शून्य मला कायमच भेटत राहिला. त्याचा अनुभव घेतच मी हळूहळू मोठी झाले. आता शिक्षक सांगतील त्याप्रमाणेच गणित करायचं असं एक सूत्र मनाशी ठरवून घेतलं होतं. पण तरीही या शून्याबद्दलची ओढ मात्र काही केल्या कमी होत नव्हती. या शून्याचे मला कौतुक वाटायचे तशी भीतीही कारण मार्क म्हणून शून्य मिळाला की भला मोठा सरांच्या मालकीचा भोपळा आपण डोक्यावर घेऊन घरी निघालोय अशी एक भयंकर भावना मनात निर्माण व्हायची. हा शून्य नेहमी सगळ्यांना मदत करायचा किंवा मदतीच्या नावाखाली सहज खड्ड्यातही घालायचा. या शून्यामुळे अनेक लोक होत्याचे नव्हते होऊन जाताना किंवा कोटीच्या कोटी उ•ाणे करताना पाहिलं की हे शून्य म्हणजे एक मायावी राक्षस आहे अशी माझी आता ठाम कल्पना होत चालली होती. प्रत्येक आकड्यांच्या पुढे शून्याची रांग लावून त्याच्या किमती कशा वाढतात याची गंमत लहानपणी दशक, एकक शिकताना आली होती. या शून्यामुळेच म्हणजे किमतीमुळेच भली भली माणसं गगनाला पोहोचलेली पाहिली आहेत. तशीच ही भली माणसं मातीत मिसळतानासुद्धा आपण पाहिली. असे कितीही आम्ही मोठे झालो, कितीही श्रीमंत असलो, तरी हे सगळं जागच्याजागी राहतं आणि शेवटी फक्त शून्य उरतो. प्रत्येकाने मिळवलेली ही शून्य किंवा धनांच्या राशी सगळे इथे ठेवून आम्ही जेव्हा मोकळ्या हाताने निघतो त्या वेळेला लक्षात येतं की
‘दुनिया मे कमाये सोना, चांदी और मोती
मरने के बाद समझ मे आया की कफन को जेब नही होती’ या वाक्याची प्रचिती येते शेवटच्या क्षणी. पूर्वीच्या काळी माणसं समाधानी होती. त्यांची श्रीमंती आकाशाएवढी असायची. त्यांच्या घरात काहीही पैसा नसला तरी दोन वेळेला पोटभर जेवून जाईल एवढं अन्न मात्र नक्की कायम घरात असायचेच. आजकाल आम्ही बघतोय अनेक लोक वर्क फ्रॉम होम करतात. पगार विचारला तर तो कमीत कमी सात आकडी असतोच. हा सात आकडी पगार कायम ठेवताना त्या माणसाची किती धावपळ होते, हे आपण बघतो. सकाळी उठल्यापासून लॉगिन झालेली ही मंडळी रात्री झोपेपर्यंत फोन कॉल अटेंड करत असतात. त्यामध्ये कसंबसं अन्न पोटात कोंबतात. कोणत्याही चवीशिवाय असलेले बाहेरचे पदार्थ फ्रिजमध्ये अंगचोरून बसतात. म्हणजे या सगळ्या नैसर्गिक क्रिया आता यांत्रिक व्हायला लागतात. सात आकडी पगार घरात बसून कमावणारी मंडळी मोठं घर घेतात, मोठ्या गाड्या घेतात, मोठी मोठी कर्जदेखील काढतात, पण या सगळ्यांमध्ये जगायचं असतं हेच मात्र विसरून जातात. म्हणजेच या लोकांना एकटेपणामुळे डिप्रेशन यायला लागलेलं दिसतं. जवळची माणसं, नातेसंबंध संपत आलेली असतात. अशावेळी त्यांच्या ही गोष्ट लक्षातच राहत नाही की हे एकावर असलेले सात शून्य हे पाठीवर घेण्याच्या ऐवजी आम्ही पोटाशी घेतल्यामुळे आम्ही स्वत:च त्या शून्याचा एक भाग होऊन बसतो. आपण शून्याच्या मागे कधीच धावायचं नसतं. शून्य आपल्या मागे धावला पाहिजे, हे गणिताचं तत्वच आम्ही विसरून जातो आणि आयुष्याची हेळसांड व्हायला सुरुवात होते. अशा या शून्यकार अवस्थेत जाण्यापेक्षा मला सामान्य माणसाची अवस्था बरी वाटते. रोज पन्नास-शंभर रुपये मिळवायचे ते संपवायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर रांगेत उभं राहायचं. म्हणजे आजच्या दिवसाचे केलेलं काम शून्य करून दुसऱ्या दिवशीच्या शून्याकडे पुन्हा वळायचं. म्हणून अशी माणसं शून्य कमवतात, असं म्हटलं तरीही ते सात शून्य मिळवणाऱ्या माणसाच्या बरोबरीतच असतात. एका बँकेत दोन माणसं मॅनेजरसमोर बसलेली होती. एक वडापावचा गाडीवाला होता तर दुसरा बिल्डर होता. दोघांच्या इनकममध्ये जमीन आसमानाची तफावत होती पण आज दोघेही एकाच पिंजऱ्यात उभे होते. दोघांकडून बँकेने दिलेल्या पैशाची परतफेड झालेली नव्हती. उत्पन्न कितीही असो शेवटी आपल्या हातात काही नाही ही भावनाच त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होती. जगामध्ये असे अनेक लोक असतात की आपलं दु:ख खूप मोठे म्हणून रडतात आणि काही लोक उगीचच गळे काढतात. सगळ्यांची दु:खाची गोळा बेरीज सारखीच. म्हणजेच प्रत्येकाजवळ इतकं सगळं असूनसुद्धा आपल्याजवळ काही नाही ही भावना तयार होणं, माणसाला शून्याच्या पातळीवरच आणते. आम्ही अशा शून्याच्या मागे धावण्यापेक्षा एखाद्या सुंदर वर्तुळात धावलो तर जास्त बरं झालं असतं.








