ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवली जात नाहीत, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला होता. भुजबळ यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका झाली. त्यानंतर भुजबळ यांनी आज त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. पण माझी जी भूमिका आहे, त्यावर मी ठाम आहे. सरकारमध्ये आहे म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांना भिडेंनी आपला वाडा दिला म्हणून तिथे शाळा सुरू झाली. ब्राम्हण आहेत म्हणून विरोध नाही. पूर्वी ब्राम्हणांच्या मुलींनाही शिक्षण नव्हतं. ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलं. त्याचा जो काही ऐतिहासीक पुरावा आहे, त्याच्यावर चर्चा करता येईल. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवली जात नाहीत हे खरं आहे. मी सरकारमध्ये आहे म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही. कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही.
जे कोणी संभाजी भिडे यांची बाजू घेतात, त्यांनी हे स्पष्ट करावं की, ते मनोहर कुलकर्णी आहेत की नाही. त्यांना संभाजी भिडे नाव का घ्यावं लागलं. आपापल्या नावाने प्रबोधन करा. पंरतु हे नाव घ्यायचं, आणि बहुजन समाजात जायचं, ते बरोबर नाही, असेही भुजबळ म्हणाले.








