संजय खूळ, इचलकरंजी
Ichalkaranji Success Stories : आयुष्यभर हजारो वंचितांना आधार देत त्यांना सक्षमपणे उभे करणारे विनायक गद्रे यांना मंगळवारी(ता.1) ब्राह्मण सभेच्या वतीने मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ अखंडपणे कार्यरत असणारी प्रयोगशाळा म्हणजेच गद्रे काका होय. त्यांचा एकूणच जीवन प्रवास अनेकांना अत्यंत प्रेरणादायी असा आहे.
अनेकांना मार्ग दाखवणारं,स्वावलंबी करणारं जोडपं इचलकरंजीचे विनायक गद्रे व विनया गद्रे होय.शेताच्या आसपास राहणाऱ्या कुटुंबातील मुलं शाळेत जात नाहीत हे पाहून काकुंना बालवाडी शिक्षिका कोर्स करायला लावला आणि काका काकूंच्या समाजजीवनाचा श्रीगणेशा झाला.प्रत्येकाला शिक्षण मिळण्यासाठी जे काही करता येईल ते ते त्या दोघांनी आयुष्यभर केलं.ज्ञानप्रबोधिनीच्या सानिध्यात आल्यावर साखरशाळा ,अगदीच शाळेत न जाणाऱ्या मुलींसाठी शिवणकाम अशा कितीतरी गोष्टी काका काकूंनी केल्या. शालेय ज्ञानाबरोबरच आकाशनिरिक्षण,पक्षी निरीक्षण,वाचनाची आवड अशा कितीतरी गोष्टींचा आनंद प्रत्येकानं घ्यावा यासाठी त्यांची धडपड आपण पाहिलीच आहे.कोकणातल्या मूळ गावी आंब्यातल्या मुलांसाठी विविध अनुभवांची रास त्यांनी रचली.हे करत असताना प्रचलित शिक्षणपद्धतीचा अट्टाहास न धरता हसतखेळत आनंददायी शिक्षणासाठी प्रयोग केले,नव्या वाटा शोधून काढल्या. काका काकूंचे विद्यार्थी आज मोठमोठी पदं भूषवित आहेत. दोघांनीही स्वतःला झोकून देऊन आनंद लुटायचं व्रत कधीच सोडून दिलं नाही.
अफाट लोकसंग्रह, विविध अधिकारी,वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार,लेखक,कलाकार यांच्या ओळखी झाल्यावर स्वखर्चाने काकां त्यांना वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना भेटवून आणतात.अशा ओळखीचा स्वतःसाठी कधीच फायदा करून न घेणारे काका काकू आपल्या या परिचयाची कधी फुशारकी ही मारत नाहीत.साध्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं भरभरून कौतुक करतात,शंभर जणांना हे कौतुक सांगतात.
गावभागातील झेंडा चौक लगत गद्रे कुटुंबीयांचे घर. विनायक गद्रे हे आयुष्यभर समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम केले.शिक्षण घेणार्या प्रत्येकाला तळमळीने मदत करण्याची धडपड त्यांनी आजही वयाची 70 वर्षे पार केल्यानंतरही कायम ठेवली आहे.ऊस तोडणीसाठी येणाऱ्या कुटुंबासोबत आलेली त्यांची लहान मुले शिक्षणापासून वंचित राहतात म्हणून त्यांनी सुमारे 28 वर्षापूर्वीच अभिनव उपक्रम सुरु केला.ऊस तोडणी कामगार रहात असलेल्या ठिकाणी शाळा सुरू केली.त्याकाळी गबाळ्यांच्या मुलांची शाळा असेच नाव प्रचलित झाले होते.अनेक वर्षे त्यांनी हे काम सातत्याने केले.त्यांच्याच या कामाचा पाठपुरावा नंतर हंगामी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण केंद्रात झाला आणि त्यातून साखर शाळा सुरू झाल्या.
शासनाने योजना सुरू करण्यापूर्वीच गद्रे काका यांनी योजना शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये राबवली होती.शिक्षण घेत असतानाच काम करा आणि शिका हा त्यांचा मंत्र अनेकांना प्रेरणादायी ठरला. छोट्या छोट्या कामातून ही आपल्या शिक्षणाचा खर्च आपण सहजपणे कसा काढू शकतो याचे हे उदाहरण प्रात्यक्षिकासह देत असत.त्यांचे घर म्हणजे विविध प्रशिक्षणाचे केंद्र बनले होते.त्यांच्या घरातील निम्मा भाग हा प्रत्येक गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी 24 तास खुले असत.विनया गद्रे या गंगामाई विद्यालयातील शिक्षिका होत्या.नोकरी काळात आणि निवृत्तीनंतरही आपला बहुतांश वेळ अशा मुलींच्या शिक्षणासाठी घालवला.गद्रे काका आणि काकू यांचं हे घर म्हणजे अनेकांना हक्काचे निवारास्थान वाटत.
आजवरच्या या प्रवासात गद्रे काका काकूंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.तरीसुद्धा सुवर्णमहोत्सवी इचलकरंजी ब्राह्मण सभेचा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळणं ही अभिमानाचीच गोष्ट आहे.मंगळवार १ ऑगस्टला विनायक गद्रे काकांना लोकमान्य टिळक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल.काका काकूंची ही आयुष्य उजळवून टाकणारी उर्जा अशीच अखंड कार्यरत राहील.








