या स्फुरणामुळे मायेची निर्मिती झाली अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, मी कपिलऋषीच्या रूपाने अवतार घेऊन आपल्या आईला (देवहूतीला) ब्रह्म आणि त्यापासून निर्माण झालेल्या प्रकृतीपुऊषाचा विचार सविस्तर सांगून उपदेश केला. तीच गोष्ट मी तुला आता सांगतो. जी गोष्ट ऐकली असता ऐकणारा मनुष्य स्वत:च ज्ञानसंपन्न होतो आणि पुऊषाहून प्रकृती भिन्न आहे आणि सर्व सुखदु:खे तिच्यामुळे आहेत हे लक्षात घेतो. सुखदु:खे पूर्णपणे मायिक आहेत असे ज्ञान त्याला होते, संसार जरी समोर दिसत असला तरी खोटा आहे हे तो लक्षात घेतो. ही बाब लक्षात न आल्याने मिथ्या संसारात आपलं कसं होईल, मुलाबाळांचं काय होईल याचं माणसाला पिढ्यानपिढ्या भय वाटत आलेलं आहे. लहान मुलाला सुरवातीला खेळण्यातल्या वाघाचे भय वाटत असते पण कालांतराने तो वाघ निर्जीव असून काहीही करायला असमर्थ आहे हे लक्षात आले की, त्याची भीती नष्ट होते. हा वाघ आपल्याला जखमी करेल असे भयाच्या भ्रमापोटी त्याला आधी वाटत असते. त्याप्रमाणे संसाराचे भ्रमापोटी वाटणारे भय संसारच मिथ्या आहे हे लक्षात आले की, नाहीसे होते. ज्याप्रमाणे अंधारात पडलेला मोत्यांचा हार भ्रमाने डोळ्यांना सापासारखा भासतो, परंतु तो भ्रम दूर झाल्यानंतर तो हार गळ्यात घातला जातो कारण सर्पाचे भय नष्ट झाल्याने भयाचा त्रास बाधत नाही. त्याप्रमाणे संसाराचे भय नाहीसे झाले की, मनुष्य त्यात राहूनसुद्धा आनंदी राहू शकतो. सांख्यशास्त्राप्रमाणे शिव आणि शक्ती यांचा विचार मी तुला सविस्तर सांगतो. तो विचार नीट लक्ष लावून ऐकलास की, द्वंद्वे सर्वस्वी नाहीशी होतात आणि एकमेव ब्रह्म सर्वत्र भरून राहिले आहे याची खात्री पटते. ब्रह्म, प्रकृती आणि पुऊष हे या संसाराचे घटक आहेत. त्यापैकी ब्रह्म हे आनंदरूप आणि एकमेव आहे. ब्रह्म जर आनंदरूप आहे तर प्रकृती आणि पुऊष ह्यांच्यामुळेच सुखदु:खे निर्माण होतात हे स्पष्ट आहे. भगवंत पुढे म्हणाले, आता ब्रह्माबद्दल तुला सविस्तर माहिती सांगतो. अगदी सुरूवातीला जेव्हा प्रलयकाल होता, तेंव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळून एकच तत्त्व होते. नंतर जेव्हा कृतयुग आले, तेव्हाही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्त्व होते.
ज्याप्रमाणे निजलेल्या पुऊषाची छाया त्याच्या अंगाखालीच नाहीशी होऊन जाते, त्याप्रमाणे माया गिळून टाकून ब्रह्म पुन्हा एकटे एकच शिल्लक राहते. ब्रह्म एकटे असून ते परिपूर्ण आहे. अशा परिपूर्ण ब्रह्मात, मी ब्रह्म असे जे स्फुरण होते, तेच मायेचे मुख्य लक्षण होय. प्रकृती आणि पुऊष यांचे जन्मस्थान होय. तेथून ती आवळीजावळी फळे जन्माला आलेली असतात. ज्याप्रमाणे दाणा पोटात धरून नि:सत्त्व कोंडा स्वत: वाढतो, त्याप्रमाणेच पुऊषाच्या योगेकरून ही प्रकृती पूर्णपणे वाढते. गोडपणाचा साठा आतील भागात ठेवून फणसाच्या अंगावर बाहेरून काटा वाढत असतो, त्याप्रमाणे पुऊषामुळे प्रकृतीलाही मोठा ताठा चढतो. ज्याप्रमाणे डोळ्यातले पाणी गोठून डोळ्यातच पडदा येतो, त्याप्रमाणे ब्रह्मामध्येही मायारूपी मळ साठून तो शुद्ध ब्रह्मालाही मलिन करून सोडतो. डोळ्यावरील पडदा दृष्टीला मंदपणा आणतो, त्याप्रमाणे माया ही आत्मानंदाच्या आड येते. त्याचीच माया त्याच्यावरच वाढून पुऊषाला वेडा करून सोडते. असे कर्त्याशिवायच आपोआप जे कार्यकारण आकाराला आले, त्याला कृतयुग म्हणतात. ज्याप्रमाणे मोड फुटलेल्या बीजाला प्रथम तीन पानांचा कोंब फुटतो, त्याप्रमाणे अ’कार, ‘उ’कार व ‘म’कार ह्यासह प्रकृतीपुऊषांमध्ये वेद उत्पन्न झाला. त्या वेदातील मथितार्थ हा की, ब्रह्म हे सत्य आणि माया ही मिथ्या होय हे लक्षात घेऊन माणसाने भेदाभेद सोडला की, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. अहो! विचारी व तज्ञ लोक हे जाणतात. अशा प्रकारे वेदाच्या विचाराने जे अभेदभावनेचे योगी होतात, ते कृतयुगापासून कलियुगापर्यंत केव्हाही होवोत, ते विचाराने नेहमी युगरहितच असतात. त्यांना युग असत नाही.
क्रमश:








