बी-बियाणांअभावी शेतकऱयांना फटका, कृषी खात्याचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन, काढणीबरोबर भात कापणीला प्रारंभ झाला आहे. त्याबरोबर काढणी झालेल्या शिवारात रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीला सुरुवात झाली आहे. माळरानावरील बटाटा, रताळी, भुईमूग काढणीला जोर आला आहे. त्याबरोबर काही भागात भात कापणीला वेग आला आहे. त्यामुळे शिवारात शेतकऱयांची धांदल उडत असल्याचे दिसत आहे.
परतीचा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने सुगी हंगाम काहीसा लांबणीवर गेला आहे. त्यातच अधून मधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. परतीचा पाऊस अधिक झाल्याने बटाटा, रताळी आणि सोयाबीन काढणी खोळंबली होती. आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बटाटा, रताळी, सोयाबीन काढणीबरोबर भातकापणीला वेग आला आहे. मात्र सर्व कामे एकदाच आल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काहीजण घरातीलच मंडळी सुगी हंगाम वेळेत संपविण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
भातकापणी झालेल्या शिवारात कडधान्यांची पेरणी केली जाते. त्यामुळे सध्या कापणी झालेल्या शिवारात मसूर, हरभरा, वाटाणा आणि इतर कडधान्यांची पेरणी केली जात आहे. काही ठिकाणी ओलावा कमी होत असल्याने पेरणीसाठी लगबग दिसून येत आहे. मसूर, हरभरा आणि वाटाणा बी-बियाणे मिळत नसल्याने शेतकऱयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. तर काही शेतकरी बियाणे मिळत नसल्याने कडधान्यांऐवजी शाळू, ज्वारी आणि इतर बियाणांची पेरणी करत आहेत.
बटाटा, रताळी आणि भात कापणी झालेल्या शिवारात मोठय़ा प्रमाणात कडधान्यांची पेरणी केली जाते. विशेषतः मका, ज्वारी, वाटाणा, हरभरा आणि इतर कडधान्यांची पेरणी केली जाते. मात्र बी-बियाणे मिळत नसल्याने शेतकऱयांचे हाल होत आहेत. परिणामी अधिक पैसे देवून खासगी दुकानांतून बी-बियाणे खरेदी करावी लागत आहेत. रब्बी हंगामात कडधान्य बियाणांची पेरणी केली जाते. मात्र कृषी खात्याकडून असलेली बियाणे मिळत नाहीत. त्यामुळे दरवर्षी शेतकऱयांना बियाणांसाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे कृषी खात्याने आवश्यक बी-बियाणे उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.
अलीकडच्या काही वर्षात बटाटा लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र रताळी वेल लागवड वाढली आहे. त्यामुळे रताळय़ांचे उत्पादन यंदा उच्चांकी वाढले आहे. दरम्यान रताळय़ाला समाधानकारक भाव मिळत असल्याने रताळी लागवडीकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे. तालुक्मयात विशेषतः इंद्रायणी, बासमती, शुभांगी, सोनम, आमन आदी जातीच्या भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. सर्रास भात पीक पोसवून कापणीला आले आहे. नदी काठ परिसर वगळता इतर ठिकाणी कापणीला आलेल्या भाताची कापणी सुरु झाली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातूर बनत आहेत. पावसाची उघडीप कायम राहिल्यास येत्या आठ दिवसांत सुगी हंगामाची धांदल उडणार आहे.









