वार्ताहर /किणये
तालुक्मयाच्या बहुतांश भागात भात कापणीला सुरुवात झाली आहे. यंदा झालेल्या परतीच्या पावसाने शिवारातील भात पिकांसह अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भात कापणीसाठी सज्ज झाले असून दिवाळीपासून कापणीला प्रारंभ करण्यात आला आहे.
सध्या माळरानावरील पिकांची अधिक प्रमाणात कापणी करण्यात येऊ लागली आहे. तसेच पाणथळ शिवारात अजूनही परतीच्या पावसाचे पाणी साचून राहिले आहे. यामुळे कापणी करताना शेतकऱयांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
शेतातून बांध फोडून भात पिकातले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. गेल्या आठ-दहा. दिवसापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे काही ठिकाणच्या शेत शिवारातील भात पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. भाताची लोंबे पोसवून आली होती .आणि अशा परिस्थितीतच परतीचा पाऊस झाला. यामुळे पिके आडवी झाली आहेत. याचा फटका शेतकऱयांना बसला आहे. इंद्रायणी, बासमती, मधुरा, इंटान ,दोडगा , सोना-मसुरा सोनम आदींसह नवनवीन जातीची भात पिके घेण्यात आली आहेत.
पावसामुळे भुईमूग व रताळी काढणे कामे खोळंबली आहेत. या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या आठ दिवसानंतर तालुक्मयाच्या सर्रास भागात कापणीला सुरुवात होण्याची शक्मयता आहे.
धामणे काटे शिवारात पेरणी हंगाम उत्कृष्ट
धामणे : गेल्या पाच-सहा दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी धामणे परिसरातील शेतकऱयांनी भातकापणीला सुरुवात केली आहे. धामणे, कुरबरहट्टी, मासगोंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी येथील शेतकऱयांनी दीपावली सण संपताच भात कापणीला सुरुवात केली आहे. परंतु गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पाणी कमी झाले असले तरी चिखल जास्त आहे. त्यामुळे भात कापणीसाठी शेतकऱयांना त्रासदायक होत आहे. सोयाबीन, भुईमूग, बटाटा काढलेल्या शिवारात या अगोदरच्या पावसामुळे पेरणी लांबली होती. आता पावसाने उघडीप दिल्याने काटे शिवारातील पेरणीसाठी हंगाम चांगला मिळत आहे. त्यामुळे काटे शिवारातील पेरणी, भात पिकाची कापणी अशी दोन्ही कामे एकाचवेळी सुरू झाली असल्याने कामाला कामगारांची कमतरता भासत आहे. परंतु शुक्रवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱयात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे येथील शेतकऱयांकडून सांगण्यात आले.
कडोली परिसरातील भात उत्पादक शेतकऱयांत चिंता
कडोली : भात सुगीच्या प्रारंभीच पुन्हा आकाशात ढग जमू लागल्याने कडोली परिसरातील भात उत्पादक शेतकऱयांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण पावसाळी हंगामात संततधार पाऊस झाल्याने आता सर्वांनाच पाऊस नकोसा झाला आहे. पण या पावसाने कडोली परिसरातील विशेष करून इंद्रायणी भात पिकांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी इंद्रायणी भातपिके जोमात आली असून भात सुगीचा हंगाम ऐन तोंडावर आला आहे. काही भात सुगीला प्रारंभ झाला आहे. पण आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आकाशात पुन्हा ढग जमू लागल्याने भात उत्पादक शेतकऱयांत चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. भाताच्या शिवारात अद्याप पाणी वाहत आहे तर काही ठिकाणी ओलावा अधिक प्रमाणात आहे. तेव्हा भात जमीन सुकण्यासाठी पावसाने उघडीप देणे आवश्यक आहे. जर पुन्हा पाऊस झाल्यास सुगी संकटात येणार आहे. सुगी हंगामात पावसाने उघडीप द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
नंदिहळ्ळी, राजहंसगड शिवारात जोंधळा पेरणीला प्रारंभ

धामणे : नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड या भागातील काटे शिवारात जोंधळा पेरणी जोरात सुरू आहे. या भागातील शेतकऱयांनी सोयाबीन, भुईमूग, बटाटा पिके गेल्या महिन्याच्या शेवटी काढली होती. परंतु, पाऊस वारंवार पडत राहिल्याने येथील काटे शिवारातील पेरणीचे काम रखडले होते. आता गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने या भागातील शेतकरीवर्ग जोंधळा पेरणीच्या कामात व्यग्र असल्याचे दिसत आहेत.
नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड भागात काटे शिवार जास्त आहे. त्यामुळे सोयाबीन व भुईमूग पिकांची लागवड जास्त असते. सदर पीक काढल्यानंतर या भागात जोंधळा पिकाची मोठय़ाप्रमाणात पेरणी केली जात आहे. भातपीक कापणीसाठी आले असले तरी शेतीकामासाठी कामगारांची कमतरता भासत असून, सध्या भात शिवारात चिखल आहे. त्यामुळे काटे शिवारातील पेरणी झाल्यानंतर भातकापणीला सुरुवात करण्यात येणार असल्याचे येथील शेतकऱयांकडून सांगण्यात आले.









