रस्त्याची दुर्दशा : वाहनधारकांचा पुढाकार, प्रशासनाला येणार का जाग?
बेळगाव : उचगाव क्रॉस ते कोवाड मार्गावरील सीमाहद्दीतील अर्ध्या कि.मी. रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रारी, आंदोलने करूनदेखील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता प्रवाशांनीच भीक मागो आंदोलन हाती घेतले आहे आणि या माध्यमातून रस्ता दुरुस्तीसाठी निधी जमा केला जात आहे. अतिवाड क्रॉसजवळ रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे ये-जा करणे जीवघेणे ठरू लागले आहे. मागील कित्येक दिवसांपासून याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर रस्त्याच्या झालेल्या परिस्थितीकडे गांभीर्याने बघितले जात नाही. त्यामुळे आता प्रवाशांनीच रस्ता दुरुस्तीसाठी भीक मागो आंदोलन हाती घेतले आहे. यानुसार रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे मागितले जात आहेत. जमा होणाऱ्या निधीतून रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.
या आंदोलनानंतर संबंधित लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येणार का? हे पहावे लागणार आहे. काही वाहनधारकांनी एकत्रित येऊन मागील दोन दिवसांपासून या मार्गावर हे आंदोलन हाती घेतले आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या आंदोलनाबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लज परिसरातील ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. याबरोबर बेळगाव तालुक्यातील नागरिकांची ये-जा देखील अधिक असते. मात्र या महत्त्वाच्या रस्त्याकडेच प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दैनंदिन वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. दरम्यान प्रशासनाला जाग आणण्यासाठी काही वाहनधारकांनी पुढे येत चक्क रस्त्यावरच भीक मागो आंदोलन सुरू केले आहे.









