रस्त्यावर भिक्षापात्र घेऊन मिळविले पैसे
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बेघर किंवा गरीब लोकांना पैसे वाटत असल्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा खरोखरच गरजूंना मदत केली जाते आणि कित्येकवेळा केवळ ह्यूज आणि लोकप्रियतेसाठी असा प्रकार घडवून आणला जातो. परंतु सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत असून यात पश्चिम बंगालचा एक इन्फ्लुएंसर भिकारी होण्याचे चॅलेंज स्वीकारतो. एका दिवसात भीक मागून किती पैसे जमविता येतात हे जाणण्यासाठी त्याने भिकाऱ्याचे सोंग घेतले होते.
पंथ देवने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकौंटवर व्हिडिओ शेअर करत ‘24 अवर्स बेग्गिंग चॅलेंज’ असे नमूद केले आहे. व्हिडिओत तो फाटलेला टी-शर्ट आणि जीन्स परिधान करून पूलाखाली बसून हातात भिक्षापात्र घेऊन असल्याचे दिसून येते. काही जणांनी त्याला पैसे दिले तर काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु दिवसभरात पैसे देणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि दिवसअखेर त्याने 34 रुपये जमविले, जे त्याने एका वृद्ध महिला भिकारीला दान केले आहेत.
व्हिडिओत तो रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांकडून भीक मागताना दिसून येतो. काही लोक त्याला 20 रुपये देतात तर काही केवळ 2 रुपयेच देत असल्याचे दिसून येते. पंथ देवच्या या व्हिडिओने सोशल मीडिया युजर्सना दोन हिस्स्यांमध्ये विभागले आहे. काही जणांनी याला पब्लिसिटी स्टंट ठरविले तर काहींनी वृद्ध महिलेला पैसे देण्याच्या त्याच्या कृत्याचे कौतुक केले आहे. एका युजरने ‘नवा स्टार्टअप आयडिया’ असे महटले आहे. भीक मागण्यात किती कौशल्य आवश्यक असते हे त्याला कळले असावे अशी टिप्पणी अन्य एका युजरने केली आहे.
पंथ देव एक व्लॉगर असून त्याचे 2500 हून अधिक फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत त्याने 180 हून अधिक पोस्ट शेअर केल्या असून यातील बहुतांश प्रँक आणि एक्सपेरिमेंटल व्हिडिओ आहेत.









