डॉ. जोशी यांच्यासह कुटुंबच विमान दुर्घटनेत बळी : बेळगाव जेएनएमसीमध्ये घेतले होते एमबीबीएसचे शिक्षण
बेळगाव : लंडनमध्ये डॉक्टर म्हणून स्थिरावल्यावर त्यांनी आपल्या पत्नीसह मुलांना घेऊन लंडनमध्ये स्थायिक होण्याचे ठरविले. त्यानुसार पत्नीने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आता सर्व कुटुंब एकत्र राहणार या आनंदात त्यांनी विमानात पाऊल ठेवले. आपल्या कुटुंबाचा सेल्फी काढला, आता यापुढे आपण एकत्रच असू, या भावनेने कुटुंबातील प्रत्येक जण आनंदित होता… परंतु क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि डॉ. प्रतिक जोशी यांचे पूर्ण कुटुंबच विमान दुर्घटनेत बळी पडले. विमान अपघातात दगावलेल्या प्रत्येकाबद्दल सर्वांनाच हळहळ वाटत आहे. परंतु डॉ. प्रतिक यांचे वैद्यकीय शिक्षण बेळगावला झाल्यामुळे येथील डॉक्टरांना, त्यांच्या प्राध्यापकांना अपार दु:ख झाले आहे. मूळचे राजस्थानच्या उदयपूर येथील प्रतिक यांनी एमबीबीएसचे शिक्षण बेळगावच्या जेएनएमसीमध्ये घेतले. 2000 ते 2005 च्या बॅचमध्ये त्यांनी ही पदवी मिळविली. त्यानंतर कोलार येथून त्यांनी रेडिओलॉजीचे पुढील शिक्षण घेतले.
काही काळ त्यांनी गुजरातच्या उदयपूर येथे प्रॅक्टीस केली व 2021 मध्ये ते लंडनला गेले. तेथील डर्बी विद्यापीठामध्ये कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यांच्या पत्नी डॉ. कोमी व्यास यासुद्धा डॉक्टर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लंडनला जाण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि गुरुवारी डॉ. प्रतिक, डॉ. कोमी, त्यांची आठ वर्षीय मुलगी मिराया, पाच वर्षांची नकुल आणि प्रद्युद ही दोन जुळी मुले यांच्यासह आनंदाने हे कुटुंब विमानात चढले. आपल्या कुटुंबाचा एकत्रित फोटोसुद्धा त्यांनी नातेवाईकांना पाठविला. परंतु क्षणात होत्याचे नव्हते झाले व हे पूर्ण कुटुंब अपघातात बळी पडले. या दुर्घटनेमध्ये आपल्या बरोबर शिकणारा आपला मित्र आणि त्याचे कुटुंबीय बळी पडले, याबद्दल त्यांच्या मित्र-मैत्रीणींना अपार दु:ख झाले आहे. सप्टेंबरमध्ये या बॅचच्या विद्यार्थ्यांनी रौप्यमहोत्सव सोहळा साजरा करण्याचे ठरवून व्हॉट्स अॅप ग्रुपही तयार केला होता. परंतु एकत्र येण्यापूर्वीच या मित्राने कायमचा निरोप घेतला. याबद्दल जेएनएमसीच्या प्राचार्य डॉ. निरंजना महंतशेट्टी आणि प्राध्यापक तसेच मित्रांनी शोक व्यक्त केला आहे.









