ओटवणे प्रतिनिधी
उद्घाटनाला डावल्यासह स्वागताचा बॅनर फाडल्याचा आरोप
आंबोली या नावाने प्रसिद्ध असलेला धबधबा पारपोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असुनही या बाहुबली धबधब्याच्या उद्घाटन प्रसंगी डावल्ल्यामुळे तसेच या धबधब्याच्या ठिकाणी पारपोली ग्रामस्थांनी लावलेला स्वागताचा बॅनर फाडल्याचा आरोप करीत मंत्र्यांनी शुभारंभ करण्याआधीच पारपोली सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी या बहुचर्चित बाहुबली धबधब्याचा शुभारंभ केला.
आंबोलीतील येथील बहुचर्चित बाहुबली धबधब्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते उद्घाटन होणार होते. मात्र हा बाहुबली धबधबा पारपोली गावाच्या हद्दीत असुनही पारपोली ग्रामपंचायतीला या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रण दिले नाही. या कार्यक्रमाला डावलूनही पारपोली ग्रामस्थांनी या धबधब्याकडे स्वागताचा बॅनर लावला होता. मात्र आंबोली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा बॅनर फाडल्याचा आरोप करीत पारपोली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेत मंत्र्यांनी या धबधब्याचा शुभारंभ करण्याआधीच आपण शुभारंभ केला.
यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका गुरव, माजी उपसरपंच प्रमोद परब, हेमंत गावकर, दत्ताराम गांवकर, दिपक पास्ते, विनायक गांवकर, सोपान परब आदी पारपोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.









