महाभारतीय युद्धाला सुरवात होण्यापूर्वी अर्जुनाने त्याचा सारथी असलेल्या श्रीकृष्णाला अशी विनंती केली की, माझा रथ दोन्ही सैन्यामध्ये उभा कर. श्रीकृष्णाने तसे केल्यावर अर्जुनाला दोन्हीकडे लढण्यासाठी सज्ज असलेले त्याचे नातेवाईक दिसून आले. युद्धामध्ये हे सर्व मरणार आणि त्यांच्या मरणास आपण कारणीभूत होणार असा विचार मनात आल्यावर तो गांगरून गेला.
त्यापूर्वी युद्धात कौरवांचा पराभव करायचा आणि आपण राज्यसुख उपभोगायचे असा विचार त्याच्या मनात ठाम झाला होता पण आपल्याला राज्यसुख मिळण्यासाठी ह्या सर्वांना मरावे लागणार हे त्याच्या लक्षात येते. तो अतिशय पापभीरु असल्याने आप्तांना मारण्याचे पाप करून त्यावर आपल्या सुखाचे इमले बांधण्याची त्यांची तयारी नव्हती म्हणून राज्यसुखाच्या अभिलाषेने ह्यांच्या मरणास कारणीभूत होण्यापेक्षा हे युद्धच नको असे तो म्हणू लागला. अर्जुनाचा हा विचार फक्त स्वत:च्या भल्याच्या पायावर उभा होता. अर्थातअशाप्रकारचे लौकिक भले सर्वसामान्य मनुष्याला नेहमीच हवेहवेसे वाटत असते म्हणून एकप्रकारे अर्जुन आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
अर्जुन हा भगवंताचा प्रिय शिष्य असल्याने तो असा संकुचित विचार करू लागल्यावर ते व्यथित झाले. हा स्वत:पुरते पहात आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला वेद आणि उपनिषदात मांडलेल्या तत्वांच्या आधारावर उपदेश करण्याचे ठरवले. सर्वप्रथम भगवंतांनी त्याला स्वरूपाची आठवण करून देताना ते म्हणतात, आपण सर्व आत्मस्वरूप असून हा देह आपल्या आत्म्याने काही काळासाठी धारण केलेला आहे.
आयुष्याचा कालावधी संपला की, आपण पुन्हा जेथून आलो आहोत त्या अव्यक्तात जाणार आहोत. आयुष्याचा कालावधी किती आहे हे ईश्वर ठरवत असतो. त्यामुळे तू स्वत:ला कर्ता समजू नकोस तसेच तू त्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेस असेही मानू नकोस. आपले मूळ स्वरूप आत्मा हे आहे आणि तो कधीही नष्ट होत नाही. हा जन्म संपला की त्याला नवा देह, नवी ओळख मिळते मग देहाचा मृत्यू झाल्याने शोक करण्याचे काहीच कारण नाही. ह्या विवेचनातून ते आत्म्याचे अविनाशित्व आणि देहाचे नश्वरपण अर्जुनाच्या मनावर
ठसवतात.
पुढे कर्मयोगाबद्दल माहिती देताना ते म्हणतात, आयुष्याच्या कालावधीत वाट्याला आलेले कर्म कसे करायचे ह्याचे स्वातंत्र्य देवाने सर्वांना बहाल केले आहे पण त्याचंबरोबर जो चुकीच्या मार्गाने जाईल त्याचे अध:पतन निश्चित होईल हे सांगून ते म्हणतात, कर्तव्याची जाणीव ठेऊन नितीशास्त्रानुसार योग्य तो निर्णय घे म्हणजे तू निवडलेले कर्म अचूक होईल. तसेच तू जर ते निरपेक्षतेने केलेस तर तुला आत्मज्ञान होऊन तुझे जन्ममृत्युचे चक्र संपुष्टात येईल.
ह्याप्रमाणे तू येथून पुढे वागत गेल्यास तुला आत्मज्ञान प्राप्त होऊन तू स्थितप्रज्ञ होशील. हा स्थितप्रज्ञ योगी ही माझी चालती बोलती प्रतिमाच असते. असा योगी हा स्वत:साठी जगत नसून समाजासाठी ईश्वरी प्रेरणा होईल त्याप्रमाणे कार्य करत असतो. त्याने ज्ञानेन्द्राrयांवर संपूर्ण ताबा मिळवलेला असतो, त्याच्या इच्छा त्याच्या काबूत असतात. त्याच्या हालचाली ईश्वरी प्रेरणेने होत असतात. त्यामुळे त्याच्या हातून होणाऱ्या कर्माना तो जबाबदार नसतो. एकदा ही स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाली की, त्याच्या अंतकाळपर्यंत टिकून राहते आणि शेवटी त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून देते. अशाप्रकारे नराचा नारायण होण्याचा मार्ग भगवंत ह्या अध्यायात प्रशस्त करतात.
क्रमश:








