सातारा, पाचगणी :
वाई तालुक्यातील पांडवगडावर सोमवारी सकाळी सहा वाजता इंदापूर तालुक्यातील नृसिंहपूर गावचे सहा युवक फिरण्यासाठी गेले होते. यावेळी एकाने परफ्युम लावल्याने गडावरील मधमाशांचे पोळे उठले. या युवकांना काही कळण्याआधीच मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात सहा जण जखमी झाले. त्यातील दोघे गडावरच बेशुद्ध झाले होते. या घटनेची माहिती वाई पोलीस, शिवसह्याद्री बचाव पथक, दिशा अॅकॅडमी, गुंडेवाडी ग्रामस्थांना कळली. त्यांनी मदतीसाठी गडावर पोहोचले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनाही या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी वाईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गडावर जाऊन उपचार देण्याच्या सूचना केल्या. यामुळे युवकांना वेळेत उपचार मिळाले.
नृसिंहपूर गावचे आल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाल आवटे, अमोल दंडवते, चैतन्य देवळे, संतोष जापे हे सहा जण सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी पांडवगडावर गेले. यातील एकाने परफ्युम लावल्याने गडावरील मधमाशा त्या वासाने आकर्षित झाल्या. या युवकांना काही कळण्याआधीच माशांनी त्यांना घेराव घालत हल्ला चढवला. माशा चावायला लागल्याने युवकांनी आरडाओरडा केला. गडावर आलेल्या काही ग्रामस्थांना युवकांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. याची माहिती वाई पोलिसांना दिली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीनिवास बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन कदम, शिवसह्याद्री बचाव पथकातील प्रशांत डोंगरे, राजेंद्र खरात, रोहित मुंगसे, आशुतोष शिंदे, सौरभ जाधव, सुयोग खरात, गुंडेवाडी परिसरातील ग्रामस्थ, दिशा शिवसह्याद्री अॅकॅडमीचे विद्यार्थी गडावर पोहोचले. जखमी युवकांना पाहून त्यांना आधार देत गडावरून खाली आणण्यास सुरूवात केली. यातील दोन युवक बेशुद्ध झाले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनाही या घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी वाईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गडावर जावून उपचार देण्यास सांगितले. डॉक्टरांनी गडावर जाऊन उपचार दिले. यामुळे युवकांना वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. सर्व युवकांची प्रकृती आता बरी असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
- परफ्युम, अत्तार वापरू नकाच…
जाहिरातीच्या युगामध्ये टीव्ही व इतर माध्यमातून वेगवेगळ्या परफ्युमच्या जाहिराती पाहून अनेक अनेक लोक प्रेरित होतात. त्या जाहिरातींमध्ये परफ्युम वापरल्यानंतर अनेक सुंदर ललना आपल्याकडे आकर्षित होतात असं चित्र दाखवले जाते. त्यामुळे असे परफ्युम वापरून ट्रेकला गेल्यास सुंदर ललना आकर्षित होतात की नाही माहिती नाही (तसे असते तर मी ही परफ्युम वापरले असते) पण मधमाशा त्या वासाने विचलित होतात व परफ्युम लावणाऱ्या व्यक्तींवरती जीवघेणा हल्ला करतात. त्यामुळे जंगलात, निसर्गाच्या ठिकाणी भ्रमण करत असताना कोणत्याही प्रकारचा परफ्युम, अत्तर व कोणत्याही प्रकारचे सुवासिक पदार्थांचा वापर न करता भ्रमण करावे.
प्रशांत डोंगरे, शिवसह्याद्री बचाव पथक वाई








