कणकुंबी येथे सात दिवसांच्या मधमाशी पालन प्रशिक्षणाला सुरुवात : महिलांचा मोठा सहभाग
वार्ताहर/कणकुंबी
राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन हैदराबाद, नॅशनल बी बी कीपिंग बोर्ड व कृषी कन्या बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि म्हादई रिसर्च सेंटर आणि विल्डरनेस्ट रिसॉर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कणकुंबी येथे सात दिवसांचे मधमाशी पालन प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. कणकुंबी आणि परिसरातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती देण्यात येत आहे. कणकुंबी येथील श्री माउली विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन म्हादई रिसर्च सेंटरचे संचालक कॅप्टन नितीन धोंड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सात दिवस चालणाऱ्या या शास्त्राrय मधमाशांचे पालन प्रशिक्षण शिबिराचे हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापनचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. शहाजी फंड, डॉ. सुशीरेखा दास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी म्हादई रिसर्चचे कामत, सह्याद्री संरक्षण समितीच्या संचालिका नायला कोयला आदी मान्यवर उपस्थित होते. कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी स्वागत केले. तर प्रशिक्षण शिबिराच्या समन्वयक ज्योत्स्ना देसाई यांनी मधमाशांच्या पालन व्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, मधमाशा ह्या पक्षी, कीटक आणि सस्तन प्राण्यांसाठी अधिवास निर्माण करण्यास मदत करतात. परागीकरणाद्वारे अन्न निर्मितीसाठी मधमाशा केवळ महत्त्वाच्या नाहीत तर त्या विविध प्रकारच्या वन्यजीवांना देखील आधार देतात. आयुर्वेदामध्ये मधाला फार मोठे महत्त्व आहे. अनेक रोगांवर गुणकारी औषध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी तसेच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जोडव्यवसाय म्हणून मधमाशी पालन करावे, असे सांगितले. सलग सात दिवस हे प्रशिक्षण चालणार असून कणकुंबी गावातील पन्नास महिला या शिबिराचा लाभ घेत आहेत.









