वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या राज्य सरकारने राज्यातली गोमांस बंदीची व्याप्ती वाढविली आहे. राज्यातील रेस्टॉरंटस्, हॉटेल्स, सार्वजनिक समारंभ आणि अन्य सामाजिक स्थाने येथेही आता गोमांसबंदी लागू करण्यात आली आहे. या स्थानांवर गोमांस किंवा त्यापासून केलेले पदार्थ वाढणे, विकणे किंवा खाणे यांच्यावर बंदी घातली गेली आहे. हा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.
बुधवारी या निर्णयाची घोषणा आसामचे मंत्री पिजुष हझारिका यांनी केली. त्याआधी मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी या निर्णयाची माहिती एक्सवर दिली होती. संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र, हा निर्णय योग्य असून काँग्रेसने याचे समर्थक करावे, अशी मागणी मुख्यमंत्री सर्मा यांनी केले आहे. पाकिस्तानवर निष्ठा असलेलेच लोक या निर्णयाला विरोध करतील, अशी खोचक टिप्पणीही हिमांत बिस्व सर्मा यांनी केली आहे.









