सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य : हिंदूंनी मजबूत होण्याची गरज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताकडे शक्तिशाली होण्याशिवाय अन्य कुठलाच मार्ग नसल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित ऑर्गनायजर या प्रकाशनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत भागवत यांनी सुरक्षेची सुरुवात समाजापासून होते, सुरक्षा हे केवळ सरकार किंवा सैन्याचे कार्य नव्हे, असे वक्तव्य केले आहे. भारताची एकताच हिंदूंच्या सुरक्षेची हमी आहे. हिंदू समाज आणि भारत परस्परांशी दृढपणे जोडलेले आहेत अणि हिंदू समाज जेव्हा सशक्त होईल, तेव्हा भारत देखील गौरव प्राप्त करणार असल्याचे भागवत यांनी हिंदूंच्या एकतेवर जोर देत म्हटले आहे.
जागतिक व्यापारावर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी आम्ही शक्तिशाली होऊ इच्छित नाही, तर प्रत्येकजण शांततापूर्ण, स्वस्थ आणि सशक्त जीवन जगू शकेल याकरता शक्तिशाली होऊ इच्छितो. आमच्या सीमांवर वाईट शक्ती सक्रीय आहेत, याचमुळे आम्हाला शक्ती अर्जित करावीच लागेल असे भागवत यांनी मूद केले आहे. भागवत यांनी शेजारी देशांमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांच्या त्यावरील मौनावर प्रश्न उपस्थित केले. जोपर्यंत हिंदू समाज स्वत: मजबूत होणार नाही तोवर जगात कुणीच त्यांच्याविषयी चिंता करणार नसल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
अधिकारांसाठी हिंदूंचा लढा
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पाहिलेला जो आक्रोश पाहिला गेला, तो अद्भूत आहे. आता तेथील हिंदू आम्ही पलायन करणार नाही, स्वत:च्या अधिकारांसाठी लडू असे म्हणत आहेत. जेथे कुठे हिंदू असतील, आम्ही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांच्या अंतर्गत शक्य ते सर्व प्रयत्न करू. हिंदू समाजाची अंतर्गत शक्ती वाढत आहे आणि संघटनेचा विस्तार या शक्तीला आणखी व्यापक रुप देईल. जोपर्यंत हे लक्ष्य पूर्णपणे प्राप्त होत नाही तोवर लढाई जारी ठेवावी लागणार असल्याचे उद्गार सरसंघचालकांनी काढले आहेत.
भारत समृद्ध राष्ट्र ठरावे
सनातन धर्माच्या खऱ्या साराला संरक्षित करण्यासाठी समाजाच्या सर्व लोकांनी जात आणि पंथाच्या विभाजनाला बाजूला सारण्याची गरज आहे. भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून कायम ठेवण्याची गरज असून हे राष्ट्र शांतता आणि समानतेला चालना देणारे असावे. ही मूल्यं देशाच्या हृदयात आहेत असे म्हणत भागवत यांनी जगातील वाईट शक्तींशी लढण्यासाठी अंतर्गत संवाद, शक्ती आणि एकतेची आवश्यकता व्यक्त केली.
युद्ध होऊ नये याची तयारी करा
जागतिक स्तरावर अजेय ठरवतील अशी शक्ती आम्हाला प्राप्त व्हावी. खरी शक्ती अंतर्गत असते, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही इतरांवर निर्भर असू नये. कुठलीही शक्ती भले मग अनेक देशांची संयुक्त शक्ती असो आम्हाला पराजित करू शकणार नाही अशी तयारी असावी. आम्ही युद्ध व्हावे अशी इच्छा करत नाही, परंतु युद्ध होऊ नये याकरता तयारी करतो असे उद्गार सरसंघचालकांनी काढले आहेत.









