सरलेले उरोनी पुरते
मातीच्या दानामधले
अलवार होवूनी धरणी
आभाळ पेलते आपले
गुलमोहर पायघडय़ांनी
गंधाळ मोगरी द्वाही
तो वळीव घेऊन येतो
ओंजळी भरूनी काही
आपली पंचेंद्रिये निसर्गात एकरूप झाली की खऱया सुखाची अनुभूती येतेच. कधी पक्ष्यांचे सुस्वर तर कधी समुद्राची गाज, रानाचे गंध, पानांची सळसळ, वाऱयाचे हुंकार अशा कितीतरी गोष्टी अनुभवणारी इंद्रियं सुखाच्या राशींवर आरूढ होतात. खरंतर हे अनुभव क्षणिक पण मनावर गारूड करणारे ठरतात, पण ओढ मात्र कायम लावून जातात. अशावेळेस दुसऱया कोणत्याच गोष्टीची इच्छा मनात उरत नाही, यालाच आत्मिक आनंद म्हणतात. तुकारामांच्या भाषेत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ उमटण्याची अवस्था.
इंद्रियांना मिळते ते सुख जे कधीच पूर्णत्वाला येत नाही पण तरीही श्रावणात मात्र जिभेचे चोचले पुरवणारा किंवा सुख देणारा प्रत्येक दिवस विविध पदार्थांची यादी घेऊनच उभा असतो. उकडीचे पदार्थ, घावन, भाजणीचे पदार्थ, उपवासाचे प्रकार विविध तळणीचे पदार्थ आणि गरमागरम पुरणपोळी त्यावर तुपाची धार, हे सगळेच मायेनं रांधणारी आणि आग्रहाने वाढणारी आई असली की श्रावणाला चार चांद लागतातच….कारण
विझलेल्या आशेला
नवीन श्वास
गोड होवून जातो
श्वासातला श्वास
मुलीच्या मायेने
सुखद शिडकावा
चांदण्याचा कवडसा
देवघरात शिरावा
तृप्तीचे रंग अश्रूंच्या सरी
श्रावण यावा वरचेवरी…
शब्दातून व्यक्त न होणाऱया आठवणींचा अल्बम म्हणजे श्रावण. ज्याचे गोफ लहानपणापासून विणायला सुरूवात होते आणि म्हातारपणात उबदार गोधडी बनते. म्हणून तर आपण श्रावणाच्या निमित्ताने माहेर गाठतो, आठवतो, माहेरचा पेढेघाटी डबा जीवापाड जपतो. माहेरच्या अंगणातल्या झाडाला मिठी मारतो, त्याच्या पाठी लपलेल्या आपल्याच बालरूपाला नव्याने भेटतो.
असाच श्रावण युरोपमधल्या एडीन होल्डन नावाच्या कवयित्रीला भेटला होता. तिच्या ‘नेचर नोटस’ या पुस्तकात आपल्यालाही भेटतो. तिला आई नसल्याने ती निसर्गातच आई शोधत फिरते, खेळते, बागडते आणि विसावतेसुद्धा. अशाच निसर्गात आमचे संतही विठूमाऊलीला बघतात, भेटतात. एका गीतात याचे खूप छान वर्णन ऐकलेय…
जागून ज्याची वाट पाहिली
ते सुख आले दारी
इथे तिथे राधेला भेटे
कृष्ण शाम मुरारी…
असे कृष्ण मेघ भेटीचा श्रावण पावसासारखा मनावर कोसळत असतो. सुखाच्या लहरींवर डोलवत असतो.
– सौ. अद्वैता उमराणीकर









