या जगात एक अद्भूत देश आहे. जेव्हा तुम्ही या देशात पाऊल ठेवता, तेव्हा तुमचे वय सात वर्षांनी कमी अपोआप कमी होते. या देशाचे नाव इथियोपिया असे असून तो आफ्रिका खंडातील देश आहे. असे घडते तरी कसे, हा प्रश्न तुमच्या मनात निश्चितच उमटला असणार. हा काही चमत्कार आहे काय, असेही अनेकांना वाटल्याशिवाय राहणार नाही. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे.
सध्या 2025 हे इसवीसन वर्ष चालू आहे. तथापि, इथियोपिया देशाच्या दिनदर्शिकेप्रमाणे त्या देशात 2017 हे वर्ष आहे. इथियोपिया हा देश इसवीसन मानत नाही. तसेच, तो सारे जग मानते तो ग्रेगोरियन कॅलेंडरही मानत नाही. इथियोपियाची स्वत:ची कालगणना असून ती गीझ कॅलेंडर म्हणून परिचित आहे. ही दिनदर्शिका ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सात वर्षांनी मागे आहे. आता असे अंतर असण्याचे कारण काय, हा प्रश्न आहे. याचे उत्तर येशू ख्रिस्ताच्या जन्मवर्षासंबंधीच्या मतभेदांमध्ये दडलेले आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे येशू ख्रिस्ताचे जन्मवर्ष इसवीसन 1 हे मानले गेले आहे. तथापि, इथियोपियाच्या चर्चचे म्हणणे असे आहे, की येशू ख्रिस्ताचा जन्म इसवीसनापूर्वी सात वर्षे झालेला होता.
या देशाची कालगणना त्यामुळे ग्रेगोरियन कालगणनेपेक्षा सात वर्षे मागे आहे. इतकेच नव्हे, तर इथियोपियन वर्षात 12 महिने नव्हे, तर 13 महिने असतात. त्यातील 12 महिने प्रत्येकी 30 दिवसांचे असतात. तर शेवटचा महिना हा 5 ते 6 दिवसांचा असतो. त्यामुळे दोन कालगणनांमध्ये हे अंतर पडलेले आहे.









