सांप्रतच्या काळात पैसा मिळविण्याचे अद्भूत मार्ग उपलब्ध आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कोण कोणत्या मार्गाने श्रीमंत होईल, हे निश्चितपणे सांगता येणे कसे कठीण असते, याचे एक उदाहरण कॅनडा या देशात सध्या घडत आहे. येथील एक व्यक्ती चक्क स्वत:ची विष्ठा विकून कोट्याधीश होण्याच्या मार्गावर आहे. तो या मार्गाने प्रतिमहिना 13 लाखांहून अधिक रुपयांची कमाई करीत आहे. जी बाब आपण टाकाऊपेक्षाही टाकाऊ समजतो ती विकून इतका पैसा कसा कमावता येईल आणि मानवी विष्ठा विकत घेते तरी कोण, हे प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. पण या प्रश्नांना उत्तरे आहेत. नुसती आहेत, असे नाही, तर ती शास्त्रशुद्ध आणि मानवी शरीरप्रकृतीशी संबंधित आहेत.
मानवी विष्ठा हा आतड्यांना होणाऱ्य् ‘क्लॉस्ट्रिडियम डिफिसाईल’ किंवा ‘सी डिफ’ नामक गंभीर विकारावरचा प्रभावी उपाय आहे, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, ही मानवी विष्ठा निरोगी माणसाची असावी लागते. याचा अर्थ असा की ही विष्ठा ‘शुद्ध’ असली पाहिजे. अशी विष्ठा हा गंभीर विकार झालेल्या रुग्णांच्या आतड्यांमध्ये घातली जाते. अशा ‘शुद्ध’ विष्ठेत आतड्यांना सक्षम करणारे उपयुक्त जिवाणू असतात. या गंभीर विकारात या उपयुक्त जिवाणूंचे आतड्यांमधील प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळे आतडी अकार्यक्षम झालेली असतात. हा विकार जीवघेणा असतो. त्यामुळे अन्य निरोगी मानवाची विष्ठा रुग्णाच्या आतड्यात घालून त्याच्या आतड्यांमधील उपयुक्त विषाणूंची संख्या वाढविली जाते. अशा प्रकारे एका निरोगी मानवाची विष्ठा दुसऱ्या रुग्णाला जीवनदान देऊ शकते. म्हणून सध्याच्या काळात मानवाच्या ‘शुद्ध’ विष्ठेला मोठी किंमत प्राप्त होत आहे. अनेक देशांमध्ये हे प्रयोग केले जात आहेत.
कॅनडातील या व्यक्तीने हे मर्म ओळखून आपली विष्ठा विकण्याच्या व्यवसायाला प्रारंभ केला आहे. तो प्रतिदिन सकाळी एका विशिष्ट भांड्यात आपली विष्ठा संकलित करतो आणि ती संबंधित प्रयोगशाळेत नेऊन देतो. त्याला याचे भरपूर पैसे मिळतात. या विष्ठेवर विशिष्ट प्रक्रिया केली जाते आणि तिचा हा गंभीर विकार दूर करण्यासाठी उपयोग केला जातो. आणखी काही काळानंतर हा उपाय सर्वमान्य आणि सर्वसामान्य होईल. त्यावेळी मानवी विष्ठेची किंमती पुष्कळ कमी होऊन तो एक प्रभावी उपाय म्हणून समोर येईल, असे संशोधकांना वाटते.









