आचरा प्रतिनिधी
“तुम्हाला आपला हात सदैव लिहिता आणि प्रवाहित ठेवायचा असेल तर त्यासाठी चोखंदळ वाचक होणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार पुस्तकांचे वाचन, जीवनात आलेल्या अनुभवांचे टिपण आणि आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण, पांढऱ्यावर काहीतरी काळे करण्याची उर्मी लिहित्या हातांना पूरवित असते.” असे उद्गार सुरेश ठाकूर अध्यक्ष, कोमसाप मालवण यांनी आचरे येथील लौकिक सांस्कृतिक भवनच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कै. जयराम परांजपे साहित्य नगरी आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले. सदर लेखन कार्यशाळेचे आयोजन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि फ्लाईंग बर्डस् स्कूल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन श्री. रामचंद्र कुबल, आचरे माजी सरपंच श्री. मंगेश टेमकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर फ्लाईंग बर्ड स्कूलच्या कार्याध्यक्ष वर्षाराणी अभ्यंकर, कोमसाप मालवणचे कोषाध्यक्ष पांडुरंग कोचरेकर, साने गुरुजी कथामाला मालवणचे सचिव नवनाथ भोळे, त्र्यंबक आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना श्री. रामचंद्र कुबल म्हणाले, “लेखकाने आपल्या लेखनामध्ये प्रवाहिता जपली पाहिजे. त्याचबरोबर आपले लेखन वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा दर्जा सांभाळून ठेवला पाहिजे. कोमसाप मालवणने नवोदित लेखकांना “पेरते व्हा’ या सदरातून उत्तम अशी संधी उपलब्ध करून दिली. त्यातून दर्जेदार साहित्य वाचावयास मिळाले.”
यावेळी कोमसाप मालवणच्या वतीने फ्लाईंग बर्ड्स् स्कूलच्या कार्याध्यक्ष वर्षा परांजपे तसेच लौकिक सांस्कृतिक भवनचे संचालक मंगेश टेमकर यांचा कोमसाप मालवणच्यावतीने स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पेरते व्हा’च्या या लेखन कार्यशाळेमधील लेखक होण्यापूर्वी, भाषा विकास, पुस्तक निर्मिती आधी विषयांवर सुरेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर “मराठी भाषा विकास” यावर खुले चर्चासत्र आयोजित केले त्यात अनुक्रमे पूर्वा खाडीलकर, दिव्या परब, विठ्ठल लाकम, अदिती मसुरकर, नारायण धुरी यांनी भाग घेतला. या कार्यशाळेमध्ये आयोजित भाषिक खेळ व साहित्यिक चर्चेत तेजल ताम्हणकर, ऋतुजा केळकर, रश्मी आंगणे, मधुरा माणगावकर, रसिका तेंडुलकर, देवयानी आजगावकर, शिवराज सावंत वैजयंती करंदीकर, सदानंद कांबळी आदी कोमसापच्या लेखकांनी सहभाग घेतला. यावेळी त्र्यंबक आजगावकर यांनी संकलित केलेल्या पेरते व्हाचे लेखक, लेखन व अभिप्राय यांच्या संकलित पुस्तिकेचे अनावरण नवनाथ भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.