माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन : सरस्वती वाचनालयातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला
बेळगाव : ‘मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी प्रतीक्षा अवघ्या पंधराव्या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांनी केली. ही प्रतिज्ञा लक्षात घेऊन त्यांचे तेज आपल्यामध्ये आणले तर आयुष्य सार्थकी ठरेल. मनात सावरकर ठेवून कणभराने तरी ते आपल्या जीवनात आणण्यासाठी प्रयत्न करा आणि ज्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे विचार माजी सनदी अधिकारी, लेखक आणि उत्तम वक्ते अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. कोरे गल्ली, शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेमध्ये ‘सावरकरांचे जीवन आणि संदेश’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, प्रमुख पाहुणे राजेंद्र बेळगावकर, अॅड. अजय सुनाळकर व वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. धर्माधिकारी म्हणाले, सावरकर समजून घेणे ही जीवनभराची साधना आहे. ज्या दिवशी चाफेकर बंधूंना जन्मठेप होणार होती, त्याच्या आदल्या दिवशी हा पंधरा वर्षीय तरुण रात्रभर जागा राहिला आणि त्याचवेळी त्याने सशस्त्र क्रांतीचा केतू उभारण्याची प्रतिज्ञा केली. साहित्याचे सर्व प्रकार म्हणजेच आत्मकथा, काव्य, पत्रलेखन, महाकाव्य सावरकर यांनी हाताळले. मराठी साहित्यातील नववृत्त त्यांच्याच नावाने म्हणजे ‘वैनायक’ या नावाने ओळखले जाते. हातातील बेड्यांच्या खिळ्याने अंदमानाच्या भिंतींवर महाकाव्य कोरल्यानंतर ब्रिटिश अधिकारी बॅरी याने त्या भिंतींवर रंग लावला.
तर त्याला धन्यवाद देत यापुढचे लेखन कोठे लिहायचे? हा प्रश्न तुम्ही सोडवला, असे सांगणाऱ्या सावरकरांच्या बुद्धिमत्तेचा आवाका थक्क करून सोडतो, असेही त्यांनी नमूद केले. दुसऱ्या महायुद्धावेळी सावरकरांनी तरुणांनी लष्करात दाखल व्हावे, अशी मोहीम हाती घेतली. कारण ते द्रष्टे होते. भारत स्वतंत्र होणारच आहे, परंतु त्यानंतर युद्धशास्त्र कळणारे सैन्य आपल्याला हवे आहे, हा दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे होता. ‘आसेतू हिमाचल ही भारतभू माझी आहे, ती माझ्या पूर्वजांची आहे’, असे मानणारा प्रत्येक जण हिंदू आहे, इतकी सरळ व्याख्या त्यांनी हिंदुत्वाची केली. भारत विश्वगुरु होण्याचे स्वप्न विवेकानंद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक या सर्वांनीच पाहिले. सावरकरांनीही तेच स्वप्न पाहिले आणि त्यासाठी आपली हयात खर्च केली, असे धर्माधिकारी म्हणाले. आजही सावरकर खऱ्या अर्थाने समजून न घेता त्यांच्यावर अनेक टीका होत आहेत. परंतु, समग्र सावरकरांचा अभ्यास केल्यानंतरच ही टीका करण्याचे धाडस होणार नाही, याकडे लक्ष वेधत पंधराव्या वर्षी सावरकर नावाच्या तरुणाने एक स्वप्न पाहिले, तशीच स्वप्ने आजच्या तरुणांना पडावीत आणि आपापल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावान होऊन त्यांनी भारतमातेची सेवा करावी, असे आवाहन धर्माधिकारी यांनी केले.
भाषाशुद्धीची चळवळ महत्त्वाची
जीवनाच्या सर्व पैलूंचे आकलन सावरकरांना होते. त्यातील आपल्याला भाषाशुद्धीची चळवळ महत्त्वाची वाटते. आज भाषा भ्रष्ट होत चालल्या आहेत. नवे शब्द तयार करण्याची, नवी संज्ञा देण्याची क्षमता मराठीमध्ये आहे. सावरकरांनी मराठीमध्ये अनेक शब्दांची भर घातली आहे. आज मराठीसहीत सर्व भाषांवर इंग्रजीचे प्रचंड आक्रमण होत असून आपले सांस्कृतिक भान हरपले आहे. ‘भाषा मरता देशही मरतो’, असे कुसुमाग्रज म्हणतात. आपण सावरकरांचा आदर्श मानत असू तर भाषाशुद्धीचा आग्रह धरायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी अविनाश धर्माधिकारी, किरण ठाकुर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वाचनालयाच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ऐश्वर्या सांगलीकर हिने सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांचा तसेच अक्षता व विनायक मोरे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुनीता पाटणकर यांनी केले. संपूर्ण वंदेमातरमनंतर व्याख्यानमालेची सांगता झाली. रविवारी अक्षय जोग यांचे व्याख्यान रुस्तुम रतनजी यांच्या स्मरणार्थ आशा रतनजी यांनी पुरस्कृत केले होते.
सावरकर पुण्यतिथी दिनीच सर्जिकल स्ट्राईक
14 फेब्रुवारी 2019 मध्ये दोन बस पेटवून दिल्याने सीआरपीएफचे 75 जवान मारले गेले. त्याचवेळी पंतप्रधानांनी याचे उत्तर मिळेल, असे सांगितले होते आणि 26 फेब्रुवारीला सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाला. ही घटना केवळ अभिमान वाढविणारीच नव्हे तर गेमचेंज करणारी आहे. त्यामुळे सावरकरांच्या पुण्यतिथी दिनी सर्जिकल स्ट्राईक झाल्याने माझ्यासाठी ही घटना मनावर कायम कोरली गेलेली आहे.









