गुकेशकडून बरोबरी, तर हरिकृष्ण विजयी, अर्जुन एरिगेसीला पुन्हा पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी (नेदरलँड्स)
टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सहकारी भारतीय लिओन ल्यूक मेंडोन्साच्या बचावाला चिरडून विजय मिळवत एकट्याने आघाडीवर जाण्यात यश प्राप्त केले आहे.
प्रज्ञानंदने सुऊवात केली तेव्हा ऊई लोपेझ पद्धतीचा वापर करून त्याने निऊपद्रवी खेळ केला होता. परंतु मधल्या खेळात त्याला संधी मिळाली जेव्हा येथे नवोदित असलेला मेंडोन्सा या दुसऱ्या हाय-प्रोफाइल गेमचा दबाव सहन करू शकला नाही. त्याचा फायदा घेत प्रज्ञानंदने 46 चालींनंतर सलग तिसरा विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे प्रज्ञानंदचे सर्व विजय स्पर्धेत आतापर्यंत भारतीयांच्या विरोधात नोंद गेले आहेत.
प्रज्ञानंद आता विश्वविजेत्या डी. गुकेशविऊद्धच्या लढतीची वाट पाहत आहे. तिसऱ्या विजयासह चेन्नईच्या या खेळाडूने या कठीण स्पर्धेच्या पहिल्या विश्रांतीच्या दिवसापूर्वी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत तीन विश्रांतीचे दिवस आहेत आणि त्यात 13 फेऱ्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, अलीकडेच विश्वविजेता बनलेल्या डी. गुकेशने नेहमीप्रमाणे त्याचा खेळ केला, पण तो रशियाऐवजी आता सर्बियाकडून खेळणाऱ्या अॅलेक्सी सरानाला मागे टाकू शकला नाही. काळ्या सोंगाट्यासह खेळण्राया या भारतीय खेळाडूने प्रत्येक युक्ती आजमावली. पण सरानाने मूलभूत गोष्टींवर टिकून राहून काहीही आपल्यासाठी घातक ठरणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे शेवटी निकाल सर्वांच्या अंदाजाप्रमाणे लागून सामना बरोबरीत सुटला.
पी. हरिकृष्णने हॉलंडच्या मॅक्स वॉर्मरडॅमला पराभूत करून स्पर्धेच्या जेतेपदावरील आपला दावा मजबत केला आहे. विदित गुजरातीने शेवटच्या क्षणी माघार घेतल्यानंतर या भारतीय खेळाडूला संघात स्थान मिळाले होते. चार सामन्यांमधून हरिकृष्णचे 2.5 गुण झाले आहेत. त्याने मॅक्सविरुद्ध फक्त 23 चालींमध्ये विजय मिळवला. दरम्यान, फक्त चार दिवसांपूर्वी अर्जुन एरिगेसी जगातील अव्वलांपैकी एक होता. परंतु येथे आल्यानंतर चित्र बदलले असून त्याने स्लोव्हेनियातर्फे खेळणारा रशियन बुद्धिबळपटू व्लादिमीर फेडोसेव्हविऊद्ध आणखी एक सामना गमावला. एरिगेसीसाठी हा आणखी एक वाईट दिवस ठरला.
चॅलेंजर्सच्या विभागात आर. वैशालीने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हला पराभूत करून मोठे पुनरागमन केले तसेच दिव्या देशमुखने तुर्कीच्या एडिझ गुरेलवर विजय मिळवून तिच्या टीकाकारांना चुकीचे सिद्ध केले. कालच्या दिवशी पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना सात खेळाडूंनी विजय नोंदविले. त्यात वैशालीचाही समावेश राहिला. दिव्याला तिच्या पहिल्या विजयासाठी चौथ्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागली. तिने 56 चालींमध्ये विजय मिळवला.









