पोलिसांच्या कृत्याचा निषेध : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
वाळूची तस्करी करणाऱयांविरोधात तक्रार केली म्हणून एका तरुणाला पोलिसांनीच मारहाण केली आहे. त्याविरोधात सौंदत्ती येथील तेग्गीहाळ गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन पोलीस व महसूल अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली हे कृत्य केल्याचा आरोपदेखील या निवेदनात करण्यात आला आहे. तेग्गीहाळ येथील सिद्धाप्पा लक्ष्मण हिरुर या तरुणाने वाळू तस्करी होत आहे. ती थांबवावी, यासाठी तहसीलदार आणि पोलीस स्थानकाला निवेदन दिले. रितसर तक्रार केली. त्यामुळे वाळू तस्करी एजंटांनी पोलिसांना हाताशी धरून मारहाण केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
सौंदत्ती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यासह इतर पोलिसांनी सिद्धाप्पा याला मारहाण केली आहे. मारहाण करून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्हय़ात जर दडपशाही सुरू असेल तर सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. निवेदन देण्यासाठी पी. जी. कुंभार, मारुती केळगेरी, जयश्री सूर्यवंशी, नागनगौडा पाटील, भद्राप्पा दंडील, विशाल आप्पयण्णावर, पूजा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









