शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : बंदोबस्त करण्याची मागणी
खानापूर : चापगाव येथील मलप्रभा नदी परिसरात असलेल्या हातखडेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या शेतात गेल्या दोन दिवसापासून एक अस्वल आणि त्याचे पिल्लू यांचा वावर असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने तातडीने अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. मलप्रभा नदी किनारी असलेल्या हातखडेश्वर देवस्थान परिसरात गेल्या दोन दिवसापासून अस्वल आणि त्याच्या पिल्लू वावरत आहे. काही शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडले होते. पिल्लू असल्याने अस्वल हल्ला करू शकते यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी दुपारी फोंडू कुऱ्हाडे हे आपल्या शेताकडे गेले होते. आपल्या शेततळ्याच्या शेजारील झाडावरील फणस काढण्यासाठी झाडाजवळ गेले असता झाडाच्या बाजूला असलेले अस्वल जोरजोरात आवाज करत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी चालून आले. त्यावेळी त्यांनी तेथून आरडाओरडा करत पळ काढला. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.
पहिल्यांदाच अस्वलाचा वावर
चापगाव परिसरात पहिल्यांदाच अस्वलाचा वावर पहावयास मिळत असल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येत आहे. यापूर्वी अन्य जंगली प्राण्यांनी चापगाव परिसरात ठाण मांडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मात्र अस्वलाचा वावर पहिल्यांदाच होत असल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन खात्याने तातडीने या अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
तातडीने बंदोबस्त करणार – वनाधिकारी
याबाबत वनाधिकारी श्रीकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबतची माहिती अद्याप आम्हाला मिळाली नाही. जर खरोखरच चापगाव परिसरात अस्वलाचा वावर असल्यास तातडीने बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.









