भागात अस्वलाच्या वावर वाढल्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट
प्रतिनिधी /वाळपई
गोवा कर्नाटक सीमेवरील झाडांनी येथे शंकर गावकर याच्यावर अस्वलाने हल्ला केल्यामुळे ते जबर जखमी झाले. त्यांच्या पायाला जबर जखम झाली असून वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोवा कर्नाटक सीमेवरील झाडांनी भागामध्ये गेल्या काही दिवसापासून अस्वलांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे.
गोवा-कर्नाटक दरम्यानच्या कृष्णापुर भागातील झाडांनी या ठिकाणी शंकर गावकर याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी 4 वा.च्या सुमारास अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. शंकर गावकर आपल्या घरापासून अवघ्याच अंतरावर रानात गेला होता. तेथे अचानकपणे अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या पायाचा चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला. त्याने आरडाओरडा केल्यामुळे अस्वल पळून गेले?. जखमी अवस्थेत घर गाठल्यानंतर त्याला वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयामध्ये दाखल केले असता प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसापासून या भागामध्ये अस्वलांचा वावर वाढू लागलेला आहे. अधूनमधून अस्वले या भागांमध्ये दृष्टीस पडत आहे. मात्र शंकर गावकर हा एकटा असल्यामुळे त्याच्यावर हल्ला केला. या वाढत्या अस्वलांच्या संख्येमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेली आहे.
दरम्यान कृष्णापुर हा भाग जरी कर्नाटक राज्यात असला तरी सदर भागात वास्तव्य करणाऱया नागरिकांची वाळपई भागामध्ये मोठय़ा प्रमाणात ये- जा असते. कारण कृष्णापुर भागातील नागरिकांना खानापूर या ठिकाणी बाजारासाठी जास्त अंतर कापावे लागते. मात्र खानापूर भाग लांब असल्यामुळे सदर भागातील नागरिक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वाळपई शहरांमध्ये जास्त प्रमाणात येत असतात.









