गणपतीपुळे वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील विलोभनीय समुद्रकिनारा गेले अनेक दिवस बिपरजॉय वादळामुळे व समुद्राच्या मोठ्या लाटांच्या भीतीमुळे भक्त पर्यटकांना आंघोळीसाठी व फिरण्यास बंद करण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून सकाळी समुद्रकिनारा पुन्हा एकदा सर्व पर्यटकांसाठी मोकळा करण्यात आला आहे.
या बाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून तालुका प्रशासनाला लेखी निवेदनाने कळविल्यानंतर या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन तालुका प्रशासनानेही आपला सकारात्मक प्रतिसाद दर्शवून गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी परवानगी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायत व तालुका प्रशासन यांच्या या चांगल्या निर्णयाबद्दल सर्वच लहान-मोठ्या स्थानिक व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
सुमारे 15 दिवसांपूर्वी बिपरजॉय चक्रीवादळाच्या सावटात गणपतीपुळे समुद्रचौपाटीवर अचानक सुमारे 6 ते 7 फुट उंचीची भयानक लाट आल्याने अनेक व्यावसायिकांचे साहित्य समुद्रात वाहून गेले होते, तर अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच समुद्रकिनाऱयावर असलेल्या पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्याने व पर्यटकांच्या वस्तूही वाहून गेल्याने त्या दिवसापासून गणपतीपुळे समुद्रकिनारा पूर्णपणे पर्यटकांना अंघोळीसाठी बंद ठेवण्यात आला होता. हा समुद्रकिनारा आंघोळीसाठी बंद असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर गणपतीपुळे तीर्थक्षेत्राकडे अनेक ठिकाणच्या पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते. 23 जूनपासून पुन्हा एकदा गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांना आंघोळ व फिरण्यासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी सध्या गणपतीपुळे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी समुद्राला चाळ पडलेले आहेत. त्यामुळे भाविक-पर्यटकांनी आंघोळ करण्यासाठी समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. त्यातच गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुल्या झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर समुद्रकिनाऱयावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. त्यामुळे पुन्हा एकदा गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात पर्यटकांचा ओघ सुरू होईल, अशी आशा येथील स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.









