हवामान खात्याचा इशारा : आजपासून आणखी मुसळधार,अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती
पणजी : गोव्याला काल मंगळवारीही दिवसभर आणि रात्रीही मुसळधार पावसाने झोडपले. आज बुधवारीही संपूर्ण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे अगोदरच सर्वत्र पूरसदृश स्थिती असताना आजही सर्वाधिक मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सरासरी 3.50 इंच पाऊस झालेला आहे. राज्यातील सांगे, केपे आणि अणजुणे धरण क्षेत्रातील भागात पावसाने इंचाची शतके ठोकली आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण सरासरी पाऊस 90 इंच पडलेला असून तो गतवर्षीच्यापेक्षा 29 टक्के अधिक म्हणजे 21 इंच अतिरिक्त पाऊस पडलेला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज बुधवारी सरासरी 7 इंचांपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. आजपासून आणखी मुसळधार पाऊस पडणार असला तरी ‘रेड अलर्ट’ मात्र जारी केलेला नाही, केवळ ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केलेला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव
राज्यात पावसाचे थैमान चालूच असून आंध्रप्रदेशकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव गोव्यासह महाराष्ट्र व तेलंगणावरदेखील पडणार आहे. त्यामुळे गोव्यात आज सर्वाधिक मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.
शनिवारपर्यंत मुसळधार कोसळणार
शनिवार दि. 29 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता मुळीच नाही. गेले काही दिवस सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यात सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सर्व नद्या दुथडी भऊन वाहत आहेत.
आज अधिक सतर्कतेची गरज
आणखी थोडा जरी मुसळधार पाऊस पडला तरी गोव्यात सर्वत्र पूर येऊ शकतो. त्यामुळे आज कोसळणार असलेल्या मुसळधार पावसाबाबत सर्वत्र सतर्क राहाण्याची आवश्यकता आहे. आज मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.









