जी-पे, फोन-पे, पे-टीएम च्या माध्यमातून लूट : जनतेने सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
पणजी : तुमच्या बँक खात्यात अनपेक्षितपणे पैसे आल्यास हुरळून जाऊ नका. कदाचित तेच पैसे तुमचे बँक खाते साफ करण्यास कारणीभूत ठरू शकते, असा इशारा पोलिस खात्याने दिला आहे. सायबर भामट्यांनी लोकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्याचा नवीन फंडा आरंभला आहे. त्याद्वारे आधी किरकोळ ‘गुंतवणूक’ करून नंतर मोठ्या रकमेवर हात मारण्याची शक्कल वापरली जात आहे. सध्या अनेक लोक याचे बळी ठरले असून आपले पैसे हातोहात लंपास झालेले पाहून कपाळावर हात मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यासंबंधी आता पोलिसांकडून लोकांना जागृत करण्यात येत आहे. पोलिसांनी या भामटेगिरीस ‘जंपड् स्कॅम’ असे नाव दिले असून जी-पे, फोन-पे, पे-टीएम यासारख्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी अधिक सावध, दक्ष होण्याची गरज निर्माण झाली आहे.
सायबर भामट्यांनी अवलंबिलेल्या नवीन क्लुप्तीनुसार आधी ते एखाद्या बँक ग्राहकाच्या खात्यात काही रक्कम स्वत: जमा करतात. त्यानंतर अनोळखी व्यक्तीकडून सदर ग्राहकास फोन करण्यात येतो आणि त्याच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही रक्कम जमा करताना एखाद्या “बक्षिसाची रक्कम”, यासारखी विविध कारणे सांगण्यात येतात. हा सारा खटाटोप संबंधित ग्राहकाचा विश्वास संपादन करण्यासाठी असतो. त्यात बऱ्याच अंशी ते यशस्वीही होतात. फुकटचे पैसे मिळत असल्याचे ऐकून अनेक ग्राहकही हुरळून जातात आणि तेथेच त्यांची फसगतही होते. त्यानंतर फोनकर्ता त्यांना खात्यातील ‘बॅलन्स’ तपासण्यास सांगतो. त्यानुसार ‘बँलन्स’ तपासण्यासाठी ग्राहकाने ‘पीन’ (स्वत:चा गुप्त क्रमांक) टाकताच, सायबर भामट्याची योजना यशस्वी होते. ग्राहकाचे बँक खाते क्षणात रिकामे होते, अशी माहिती पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे.
यावर सावधगिरी व उपाय योजनाही पोलिसांनी सूचविल्या आहेत. त्यानुसार अशाप्रकारे स्वत:च्या खात्यात अनपेक्षित पैसे जमा झाल्यास आणि त्यासंबंधी अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास कधीच त्याच्या सांगण्यास बळी पडू नये. तसेच लगेचच पीन क्रमांक टाकून बॅलन्स तपासण्याची चूक करू नये. त्याही पुढे अधिक दक्षता म्हणून पहिल्यांदा स्वत:चा पीन क्रमांक चुकीचा टाकावा. तसे केल्याने सायबर भामट्यांकडून तुमचे पैसे लुटण्याचे प्रयत्न असफल होतील. त्यानंतर खरोखरच बॅलन्स तपासण्याची आवश्यकता असेल तरच तो प्रयत्न करावा, अन्यथा बँक बॅलन्स जाणून घेण्यासाठी अन्य मार्गांचा अवलंब करावा, असे पोलिसांकडून सूचविण्यात आले आहे. ‘सायबर सुरक्षित गोवा मंत्र-27’ अंतर्गत पोलिसांनी हा संदेश जारी केला आहे. त्याद्वारे प्रत्येकाने स्वत: दक्ष, सावध, जागृत राहावे आणि हाच संदेश इतरांपर्यंत पोहोचवून सायबर भामटेगिरीसंबंधी जागृती करावी, असे आवाहन केले आहे.









