जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची महसूल अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती तयारी करा. याचबरोबर सरकारने गृहलक्ष्मी, अन्नभाग्य, गृहज्योती, युवानिधी, मोफत प्रवास या योजना लागू करण्याचे जाहीर केले आहे. त्यांची अंमलबजावणी योग्यरितीने करावी, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
जिल्ह्यातील संभाव्य पूर व्यवस्थापनाची सर्व तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियोजन करा. योग्यप्रकारे पुराच्या काळात सर्व सुविधा सामान्य जनतेला पोहोचविण्याचे काम करा, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल अधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेऊन त्यांनी या सूचना केल्या आहेत.
सरकारने पाच योजना लागू केल्या आहेत. त्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यांची पुरेशी अंमलबजावणी काटेकोरपणे पूर्ण करा. शासनाच्या मार्गसूचीनुसारच या योजनांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक आणि कर्तव्यनिष्ठेने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
काळजी केंद्राची स्थापना करा
नैसर्गिक आपत्तीपासून मनुष्य तसेच पशु जीवित हानी होऊ नये, कोणतीही जीवितहानी झाल्यास 24 तासांच्या आत नुकसानभरपाई द्यावी, असे यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदारांना सांगितले. पुराचे पाणी घरांमध्ये शिरते. नुकसान झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओ तयार करावेत. संबंधितांना नुकसानभरपाई देण्यासाठी कागदपत्रांमध्ये नोंद करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नदीकाठावरील गावांना पुराचा धोका निर्माण होतो. जी धोकादायक गावे आहेत त्यांना ताबडतोब निवारा केंद्रात हलवावे. निवारा केंद्रांमध्ये जेवणाची तसेच इतर व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी आताच नियोजन करा. निवारा केंद्राची तसेच पूरग्रस्त भागाची आताच पाहणी करा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड
दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरक्षणानुसार निवडणूक करावी. तालुकानिहाय बैठक घ्या. शासनाच्या मार्गदर्शनानुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष आरक्षणाबाबत दि. 9 ते 12 जून या कालावधीत स्वतंत्रपणे बैठक घेऊन जाहीर करावी, असेही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. सदर निवडणूक जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
पीक नुकसानीबाबत पोर्टलवर माहिती द्या
जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले तर भरपाईबाबत पोर्टलवर माहिती द्यावी. कारण शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळणे महत्त्वाचे आहे. पिकांच्या नुकसानीबाबत संयुक्तपणे सर्व्हे करून तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी या पोर्टलवर संपूर्ण माहिती दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पाणी समस्या दूर करण्याबाबत सूचना
काही भागांमध्ये अजूनही पाऊस झाला नाही. वाढलेल्या उष्म्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर बैठका घेऊन ज्या भागामध्ये कूपनलिका तसेच विहिरींना पाणी नाही, त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी सूचना यावेळी देण्यात आली आहे. शुद्ध पाणीपुरवठा करावा, याबाबत काळजी घ्यावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई तातडीने द्या
विविध कारणांनी शेतकरी आत्महत्या करत असतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर मोठा अघात होतो. तेव्हा त्यांच्या कुटुंबांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचला. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना नुकसानभरपाई मिळण्यास विलंब झाला आहे. बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत. तेव्हा तातडीने त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीला प्रांताधिकारी बलराम चव्हाण, चिकोडीचे प्रांताधिकारी माधव गिते, बैलहोंगलचे प्रांताधिकारी प्रभावती, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच महसूल अधिकारी बैठकीला उपस्थित होते