महानगरपालिकेकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई; ब्लॅक स्पॉट हटविण्यास सुरुवात
प्रतिनिधी/ बेळगाव
ओल्ड बी. पी. रोडवरील भूमिगत स्मार्ट डस्टबिनमध्ये कचरा टाकण्याऐवजी बाहेर कचरा फेकून देणाऱ्याची मोटारसायकल महापालिकेकडून जप्त करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून संबंधितांकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्यानंतर मोटारसायकल परत करण्यात आली. त्याचबरोबर कचरा टाकण्यासाठी आलेले नागरिक आणि पीजी विद्यार्थ्यांना माघारी धाडण्यात आले.
शहरातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे नागरिक जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे सर्वत्र पुन्हा ब्लॅक स्पॉट तयार होत आहेत. परिणामी दुर्गंधी पसरत असून याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. कचऱ्याच्या ढिगावर मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडून सातत्याने शहरात फेरफटका मारून कचऱ्याची वेळेत उचल करण्यासह योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात सूचना केली जात आहे. तर दुसरीकडे नागरिक घंटागाडीकडे कचरा देण्याऐवजी जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकून देत असल्याने जिकडे तिकडे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्लॅक स्पॉट निर्माण होऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी बाकडे, कुंड्या ठेवण्यासह फुलांची सजावट केली जात आहे. तरीदेखील अद्याप नागरिकांमध्ये म्हणावी तशी जनजागृती होताना दिसत नाही.
शहराच्या दक्षिण भागात भूमिगत डस्टबिन बसविण्यात आले आहेत. पण, सदर डस्टबिनमध्ये कचरा टाकण्याऐवजी अनेकजण बाहेर कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे आता ही बाब महानगरपालिकेच्या आरोग्य आणि पर्यावरण विभागाच्यावतीने गांभीर्याने घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी आरोग्य आणि पर्यावरण निरीक्षक थांबून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास ओल्ड पी. बी. रोडवर कचरा टाकणाऱ्यांना माघारी धाडण्यात आले. त्यानंतर कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सांगून घरोघरी जाऊन कचरा उचलण्यात आला. तसेच कचरा टाकण्यास आलेल्या एका मोटारसायकल चालकावर कारवाई करून मोटारसायकल जप्त करण्यात आली. 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्यानंतर सकाळी सदर मोटारसायकल सोडून देण्यात आली. ब्लॅक स्पॉट ठिकाणांच्या कचऱ्याची उचल करून साफसफाई करण्यात आली आहे.









