विरोधकांच्या आघाडीला घाबरू नका : गाफिलपणा दाखवू नका
वृत्तसंस्था/ पुणे
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधी पक्ष ‘इंडिया’ या नावाने एकत्र आल्याने राजकीय संघर्ष व्यापक होऊ शकतो. परंतु यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, तसेच निष्काळजीपणा दाखवूनही चालणार नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत भाजपला ही ‘दक्ष’ सूचना करण्यात आल्याचे समजते. ही बैठक शनिवारपर्यंत चालणार असून यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पुण्यात सुरू झाली आहे. बैठकीच्या प्रारंभी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी भारतामातेच्या प्रतिमेचे पूजन केले. या बैठकीत संघाच्या 36 संघटनांचे पदाधिकारी सामील झाले आहेत. संघाच्या बैठकीत सामील होण्यासाठी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा देखील पुण्यात दाखल झाले. या बैठकीत संघाच्या विविध संघटनांकडून मिळणारा फीडबॅक आगामी लोकसभा निवडणुकीकरता महत्त्वाचा मानला जात आहे.
समन्वय बैठकीत 30 महिला प्रतिनिधींसह 267 पदाधिकारी सामील झाले आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीत राष्ट्रीय आणि सामाजिक स्थिती, शिक्षण, सेवा, अर्थव्यवस्था तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पर्यावरण, सामाजिक समरसता आणि संघटन विस्तारावरही चर्चा केली जाणार आहे. मागील वर्षी अशाचप्रकारची बैठक छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पार पडली होती. तर नोव्हेंबर महिन्यात अशाच प्रकारची आणखी एक बैठक गुजरातच्या भूज येथे होणार असल्याचे समजते.









