रामनवमी दंगलींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची राज्यांना सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रामनवमीदिवशी काही राज्यांमध्ये धार्मिक दंगली आणि हिंसाचार घडविण्यात आला आहे. आता आज गुरुवारी हनुमान जयंती आहे. त्यादिवशी सर्व राज्यांनी कोणताही हिंसाचार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केंद्र सरकारच्या गृह विभागाने सर्व राज्यांना केली आहे. बुधवारी ती प्रसारित करण्यात आली.
हनुमान जयंती हा उत्सवही भारतात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात आणि सार्वजनिकरित्या साजरा करण्यात येतो. राज्यांनी हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. कोणत्याही स्थानी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता राज्य सरकारांनी घ्यावी. संवेदनशील भागांमध्ये आधीपासूनच उपाययोजना करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले.
अद्यापही हिंसाचार
रामनवमी दिवशी पश्चिम बंगाल, बिहार आणि अन्य काही राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. पश्चिम बंगालच्या हावडा भागात आजही परिस्थिती पुरेशी शांत झालेली नाही. राजकीय पक्ष हिंसाचार, जाळपोळ आणि दंगली यांची जबाबदारी परस्परांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये आजही काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बिहारमध्येही हिंसाचार मोठय़ा प्रमाणात झाला आहे.
मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांमधील हिंसाचारासाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. बिहारमधील हिंसाचार पूर्वनियोजित आणि राजकीय असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला. मात्र, नितीशकुमार अकार्यक्षम मुख्यमंत्री असून त्यांचे अपयश भाजपच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, असा पलटवार भाजपने केला आहे. बिहारमध्ये हिंदूंचे सण साजरे करण्यात राज्य सरकारच गुंडांच्या साहाय्याने अडथळे निर्माण करीत आहे. पश्चिम बंगालमध्येही हीच परिस्थिती आहे, असा आरोपही भाजपने केला आहे.
केंद्राचे साहाय्य घ्या
हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडून संरक्षण दलांच्या तुकडय़ा घ्याव्यात अशी सूचना कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. रामनवमीदिवशी राज्यात झालेल्या हिंसाचारासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही सूचना केली आहे.









