स्वार्थ, फायद्याचा विचार न करण्याचे पणजीतील सभेत आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
पणजीतील कांपाल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विराट जनसमुदायाला भागवत मार्गदर्शन करीत होते. यावेळी उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुलक्षणा सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सभापती रमेश तवडकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दामू नाईक विविध मतदारसंघाचे आमदार, माजी आमदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामर्थ्यशाली भारताचे उदाहरण देताना भागवत म्हणाले, संघाच्या कार्यकर्त्यांनी आजवर खूप कष्ट, प्रामाणिकपणे कार्य करून देशाला मोठे बनविण्यात वाटा उचलला आहे. यापुढेही घरातून बाहेर पडताना सर्व समाजातील बांधव हे आपले बांधव आहेत, याचाच विचार करून कार्य व्हावे. संघामध्ये केवळ कार्याला महत्त्व आहे. लाभासाठी संघात यायचे झाल्यास अशा गोष्टींना संघात थारा नाही. संघ हा देशाची ताकद आहे. त्यामुळे संघाचे काम करताना फायद्याचा कधीच विचार करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
जीवनात अनुशासनाला खूप महत्त्व आहे. शिस्त, अनुशासन याच्या जीवावर कानून व्यवस्था व नियमांचे पालन करा. याला संविधानातही महत्त्व आहे. त्यामुळे संघाशी निगडित असलेल्या प्रत्येकाने शिस्त व प्रामाणिकपणा हा जपायलाच हवा. भाजपात आज भ्रष्ट नेते असल्याचा आरोप होतो याचे कारण म्हणजे सत्तेवर येण्यासाठी भ्रष्ट नेत्यांना दिलेले स्थान हे आहे. परंतु या नेत्यांनीही शिस्तीने काम करून संघाच्या प्रामाणिक कार्याची आठवण ठेवावी, असा सल्ला भागवत यांनी दिला.
‘जसा राजा तशी प्रजा’ हा प्राचीन काळापासूनचा नियम आहे. त्यामुळे सत्ताधाऱयांनी आमची भाषा, पेहराव हे भिन्न असले तरी आपण सर्व समाजातील लोक एक आहोत, याची जाणीव ठेवून कार्य करायला हवे. कारण जसा समाज आहे, तसे त्या त्या देशाला नेते मिळाले आहेत. ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे..’ याचे उदाहरण देताना भागवत म्हणाले, आपण जसा चांगला विचार करतो,
या मातीशी प्रामाणिक राहतो, त्याप्रमाणेच नवी पिढी घडत असते. भारताला उच्च स्थानावर नेताना हे सर्व विचार, शिस्त व आपलेपणाची भावना आपल्या अंगी बाळगावी, असे त्यांनी आवाहन केले.दरम्यान, भागवत यांच्या सभेसाठी लोक मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था होती. जागोजागी पोलीस, वाहतूक पोलीस, आरोग्य सेवा म्हणून 108 रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी चोख पार्किंग व्यवस्थाही ठेवण्यात आली होती. सभा संपल्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.









