गोरखनाथ, सुप्रिया पती-पत्नीचा पराक्रम : पदाचा गैरवापर, सत्य दडवण्याचे केले कृत्य
तिसवाडी : खोर्लीचे सरपंच गोरखनाथ केरकर आणि उपसरपंच सुप्रिया केरकर या पती-पत्नी जोडीवर गंभीर आरोप सिद्ध झाल्याने त्यांना गोवा पंचायत राज कायदा 1994 च्या कलम 12 (1) (ड) अंतर्गत तिसवाडी गट विकास अधिकारी अनिल एल. धुमसकर यांनी काल सोमवार 6 ऑक्टोबर रोजी अपात्र ठरवण्यात आले आहे. स्वार्थासाठी पंचपदाचा गैरवापर आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तिसवाडीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) ठोस पुराव्यांच्या आधारे हा निर्णय घेतला असून, दोघांनाही पंचायत सदस्यत्वातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे.
बीडीओच्या आदेशानुसार, गोरखनाथ आणि सुप्रिया या पती-पत्नीने 28 डिसेंबर 2023 रोजी दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले होते. एक अर्ज व्यावसायिक आस्थापनासाठी, तर दुसरा तात्पुरत्या तंबूसारख्या बांधकामासाठी तात्पुरता घर क्रमांकासाठी केला होता. दोन्ही मालमत्ता त्यांच्या मालकीच्या होत्या. 29 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पंधरवड्याच्या बैठकीत हे प्रकरण मांडण्यात आले. मात्र, यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यावर या दोघांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप करण्यात आला. तपासात बीडीओने स्पष्ट केले की, गोरखनाथ आणि सुप्रिया यांनी पंच सदस्य म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून वैयक्तिक स्वार्थ साधला.
कागदपत्रांमध्ये फेरफार करून सत्य दडवण्याचा त्यांचा प्रयत्न उघड झाला. पुराव्यांच्या आधारे दोघेही दोषी आढळले असून, त्यांना तात्काळ अपात्र ठरवण्यात आले आहे. हा निर्णय पंचायत संचालनालय आणि राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात आला आहे. हा प्रकार खोर्ली पंचायतीसह संपूर्ण गोव्यात खळबळ माजवणारा ठरला आहे. स्थानिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असले तरी, पंचायत राजवटीतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोरखनाथ आणि सुप्रिया यांच्या कृतीमुळे पंचायत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.









