बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित विश्व फुटबॉल दिनाचे औचित्य साधून मैत्रीपूर्ण सामन्यात बीडीएफएने तामिळनाडू संघाचा अटीतटीच्या लढतीत 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. लव्ह डेल स्कूलच्या मैदानावर बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने ज्येष्ठ फुटबॉलपटूंसाठी सामना आयोजित केला होता. सामन्याचे उद्घाटन बीडीएफएचे अध्यक्ष पंढरी परब, लेस्टर डिसोझा, गोपाळ खांडे, अमित पाटील यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करुन करण्यात आले. सदर सामना बीडीएफए व तामिळनाडू या संघादरम्यान खेळविण्यात आला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला बीडीएफएच्या अल्लाबक्ष बेपारीच्या पासवर भालचंद्र धुरीने सुरेख गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 17 व्या मिनिटाला तामिळनाडूच्या अमितकुमारच्या पासवर कृष्णनने गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली.
पहिल्या सत्राला 1 मिनिट बाकी असताना बीडीएफएच्या भालचंद्र धुरीच्या पासवर इम्रान बेपारीने गोल करुन 2-1 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमक चढाया सुरु केल्या. खेळाच्या 34 व्या मिनिटाला तामिळनाडूच्या हरियनच्या पासवर अमितकुमारने दुसरा गोल करुन 2-2 अशी बरोबरी केली. त्यानंतर बीडीएफने आक्रमक चढाया सुरु केल्या. 47 व्या मिनिटाला जॉर्जच्या पासवर भालचंद्र धुरीने तिसरा गोल करुन 3-2 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तामिळनाडू संघाने गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण बीडीएफएच्या बचावफळीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सामन्यानंतर बीडीएफएचे अध्यक्ष पंढरी परब, लेस्टर डिसोझा, गोपाळ खांडे, अमित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघाच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या मैत्रीपूर्ण सामन्यामुळे सर्वत्र आनंद पसरला असून पुढील स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण व्हावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.









