आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा विश्वास : आतापर्यंत 7 जणांकडून उमेदवारी अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) निवडणुकीत आमच्या पॅनेलमधून निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास आहे. विजय मिळण्यासाठीच आम्ही स्पर्धा करीत आहोत, असे अरभावीचे आमदार व बेमूलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. गुरुवारी पत्रकारांसमोर ते बोलत होते. आमच्या पॅनेलमधून 16 जागांपैकी 13 जागांसाठी निवडणूक लढविण्यात येईल. आतापर्यंत 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला 6 जण अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही 13 जागांवरून निवडणूक लढविणार आहोत. मात्र अविरोध निवड होईल की निवडणूक लढवावी लागेल हे 11 ऑक्टोबरच्या दुपारी 3 पर्यंत स्पष्ट होईल.
सध्या निपाणीतून आण्णासाहेब जोल्ले, रायबागमधून आप्पासाहेब कुलगोडे, यरगट्टीतून आमदार विश्वास वैद्य, सौंदत्तीतून वीरुपाक्ष मामनी, बैलहोंगलमधून महांतेश दोड्डगौडर, खानापुरातून अरविंद पाटील व कित्तूरमधून विक्रम इनामदार यांनी अर्ज दाखल केला आहे. आणखी सहाजण 11 तारखेला अर्ज दाखल करतील. ही निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून बेळगाव, गोकाक, मुडलगी, रामदुर्ग, हुक्केरी व इतर मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित करण्यात येतील. जारकीहोळी कुटुंबातून कोण स्पर्धा करणार की नाही? या प्रश्नावर आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेंगळूरला गेले आहेत. ते येथे दाखल झाल्यानंतर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. हुक्केरीतून राजेंद्र पाटील हे आमचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अविरोध निवडीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत खरे, पण निवडणूक व्हायचीच झाल्यास त्यालाही आम्ही सिद्ध आहोत, असेही ते म्हणाले. उमेदवार आण्णासाहेब जोल्ले, आप्पासाहेब कुलगोडे, महांतेश दोड्डगौडर, अरविंद पाटील, विक्रम इनामदार, वीरपाक्ष मामनी आदी यावेळी उपस्थित होते.









