कुलदीप यादव, अक्षर पटेल यांना श्रेणीमध्ये बढती मिळण्याची शक्यता
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या आठवड्याच्या अखेरीस 2025-26 हंगामासाठीच्या केंद्रीय करारांची घोषणा करण्याची शक्यता असून बीसीसीआयच्या सूत्रांनी तसे सांगितले आहे. सूत्रांनुसार, स्टार फिरकीपटू कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना ‘ग्रेड बी’वरून ‘ग्रेड ए’मध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. 2024-25 हंगामातील करारातून वगळण्यात आलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर देखील कराराच्या यादीत परतण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे ‘ए प्लस ग्रेड’मधील त्यांचे स्थान कायम ठेवण्याची शक्यता आहे. कुलदीप आणि अक्षर हे अलीकडील दोन आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदांमध्ये (आयसीसी टी-20 विश्वचषक, 2024 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025) सर्वोत्तम कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंपैकी आहेत. टी-20 विश्वचषकात कुलदीपने 10, तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 7 बळी घेतले. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही दोन्ही स्पर्धांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. 2024 च्या टी-20 विश्वचषकात त्याने 92 धावा केल्या आणि 9 बळी घेतले.
तर चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 109 धावा केल्या आणि पाच बळी घेताना प्रति षटक सरासरी फक्त 4.35 धावा दिल्या. अक्षरला इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी बढती देण्यात आली आहे आणि सहा सामन्यांतील पाच विजयांसह त्याने शानदार सुऊवात केली आहे. गेल्या वर्षी केंद्रीय करारातून काढून टाकण्यात आलेल्या श्रेयस अय्यरनेही संस्मरणीय कामगिरी केलेली असून कोलकाता नाईट रायडर्सला त्याने कर्णधार म्हणून आयपीएल जिंकून दिली. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी, इराणी कप आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचा वाटा राहिला आहे. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतील यश त्याने कर्णधार म्हणून मिळविले. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान एकदिवसीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्व स्वरूपांत भरपूर धावा केल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. पंजाब किंग्सच्या कर्णधारपदी असलेल्या अय्यरची आयपीएलमधील सुऊवातही चांगली राहिली आहे. आतापर्यंत सहापैकी चार सामने त्याने जिंकले असून सहा सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह 250 धावा केल्या आहेत.









