हरमनप्रीत, स्मृती, दीप्ती शर्मा अ श्रेणीत कायम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयने महिलांच्या मध्यवर्ती कराराची घोषणा केली असून भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना व अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना अ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाज रेणुका ठाकुर, अष्टपैलू जेमिमा रॉड्रिग्स, यष्टिरक्षक रिचा घोष व सलामीवीर शफाली वर्मा यांना ब श्रेणीमध्येच ठेवण्यात आले आहे. डावखुरी स्पिनर राजेश्वरी गायकवाड गेल्या वर्षी ब श्रेणीत होती, पण यावेळी तिला कोणत्याही श्रेणीत ठेवण्यात आलेले नाही. युवा ऑफस्पिनर श्रेयांका पाटील, वेगवान गोलंदाज तितास साधू व अरुंधती रे•ाr, अष्टपैलू अमनजोत कौर, यष्टिरक्षक उमा छेत्री यांना पहिल्यांदाच मध्यवर्ती करार मिळाला असून त्यांना क श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत यास्तिका भाटिया, राधा यादव, स्नेह राणा, पूजा वस्त्रकार यांनाही याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे. मात्र मेघना सिंग, देविका वैद्य, एस. मेघना, अंजली सरवानी, हरलीन देओल यांना करारात सामील करण्यात आलेले नाही.
अ श्रेणीतील महिला क्रिकेटपटूला सामना मानधनाव्यतिरिक्त वार्षिक 50 लाख रुपये, ब श्रेणीसाठी 30 लाख व क श्रेणीसाठी 10 लाख रुपये देण्यात येतात. यावर्षी भारतातच वनडे वर्ल्ड कप होणार आहे, त्यावेळी भारतीय संघाला उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. महिला संघाला सर्व सुविधा मिळत आहेत, पण अद्याप त्यांना एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
करारबद्ध केलेल्या खेळाडू : अ श्रेणी : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा. ब श्रेणी : रेणुका ठाकुर, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, शफाली वर्मा. क श्रेणी : यास्तिका भाटिया, राधा यादव, श्रेयांका पाटील, तितास साधू, अरुंधती रे•ाr, अमनजोत कौर, उमा छेत्री, स्नेह राणा, पूजा वस्त्रकार.









