अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यांत अनुक्रमे रिषभ पंतला पाऊल फ्रॅक्चर झाल्यामुळं आणि ख्रिस वोक्सला खांदा सुटल्यामुळं खेळात सहभागी होणं अशक्यप्राय बनलं…या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) 2025-26 च्या देशांतर्गत हंगामातील बहुदिवसीय सामन्यांसाठीच्या खेळण्याच्या परिस्थितीत महत्त्वाचा बदल केलाय…
- याअंतर्गत ’गंभीर दुखापतीनं ग्रस्त’ खेळाडूला बदलण्याबाबत कलम लागू करण्यात आलंय. यामुळं संघांना दुखापतीमुळं सामन्यात पुढं भाग घेऊ न शकणाऱ्या खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवता येईल. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू करण्यात आलेल्या ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ नियमाप्रमाणंच हे आहे…
- भारताच्या बहुदिवसीय स्थानिक क्रिकेटमध्ये, प्रामुख्यानं प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, एका हंगामासाठी ‘आयसीसी’च्या सूचननेनुसार ‘बीसीसीआय’नं हा नियम लागू केलाय. जो खेळाडू दुखापतग्रस्त होतो तशाच पठडीचा खेळाडू उतरविण्यास मुभा देणारा हा नियम फक्त बाह्य दुखापतींसाठी लागू आहे आणि अलीकडेच अहमदाबादमध्ये झालेल्या चर्चासत्रात स्थानिक पंचांना तो समजावून सांगण्यात आलाय…
- दुलीप चषक, इराणी चषक आणि रणजी चषक तसंच कूचबिहार चषक (19 वर्षांखालील स्पर्धा) व कर्नल सी. के. नायडू चषक (23 वर्षांखालील खेळाडूंसाठी) या स्पर्धांना हा नियम लागू होतो…तथापि, ‘बीसीसीआय’कडून देशांतर्गत मर्यादित षटकांच्या सय्यद मुश्ताक अली किंवा विजय हजारे स्पर्धेत अशा प्रकारे दुखापतग्रस्त खेळाडूला बदलण्यास परवानगी देण्यात आलेली नाही…
- सध्याच्या ‘आयसीसी’ नियमांनुसार, एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाल्यास किंवा कोविड-19 चा संसर्ग झाल्यास संघांना बदली खेळाडू घेण्याची परवानगी असते. परंतु जखमी खेळाडूची जागा दुसरा खेळाडू वापरून भरून काढण्याची मुभा दिली जात नाही. सहसा इतर खेळांमध्ये तशी मोकळीक राहते…
- सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूला बदलण्याचा कोणताही नियम नसला, तरी आगामी हंगामासाठी बीसीसीआयनं लागू केलेलं नवीन कलम हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या यासंदर्भातील प्रयोगाचा भाग. ‘बीसीसीआय’ हा नियम लागू करणारा पहिला पूर्ण सदस्य ठरलाय…
- सामना सुरू झाल्यानंतर कोणत्याही वेळी (यात सामनापूर्वीच्या ‘वॉर्म-अप’ कालावधीचाही समावेश होतो) मैदानावर गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूच्या जागी सामन्याच्या उर्वरित कालावधीसाठी पूर्णपणे सहभागी होणाऱ्या तशाच प्रकारच्या खेळाडूला (उदाहरणार्थ फलंदाजाच्या जागी फलंदाज नि गोलंदाजाच्या जागी गोलंदाज) खेळवता येईल, असं ‘आयसीसी’नं 25 जून रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं…
- या नियमाची माहिती ‘बीसीसीआय’नं राज्य संघटनांना पाठवलेली असून तो लगेच म्हणजे 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीपासून लागू होईल…
- खेळाडूला पूर्णपणे बदलण्यासाठी खेळाच्या दरम्यान व मैदानावर त्याला गंभीर दुखापत होणं गरजेचं. ही दुखापत बाह्य आघातामुळं झालेली असावी आणि ती फ्रॅक्चर, खोल घाव वा ‘डिसलोकेशन’ आदी प्रकारची असावी. या दुखापतीमुळं खेळाडू उर्वरित सामन्याकरिता अनुपलब्ध व्हायला हवा, असं हा नियम सांगतो…
- मैदानावरील पंचांना गंभीर दुखापतीची व्याप्ती ठरविणं आणि दुखापतग्रस्त खेळाडूला बदलण्याची परवानगी देणं, याबाबतीत निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार असतील. ते बीसीसीआय सामनाधिकारी किंवा मैदानावर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतील…
– राजू प्रभू









