गोवा क्रिकेट संघटनेच्या मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकरला मिळाले स्थान
वृतसंस्था /नवी दिल्ली
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर योगदान देऊ शकणारे अष्टपैलू क्रिकेटपटू तयार करण्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कल आहे. याच्या अनुषंगाने बीसीसीआयने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तीन आठवड्यांचे शिबीर आयोजित केले असून यासाठी देशातील 20 उदयोन्मुख क्रिकेटपटूंना बोलावण्यात आले आहे. यात गोव्याच्या मोहित रेडकर व अर्जुन तेंडुलकर या रणजीपटूंचा समावेश आहे. बेंगलोलमधील एनसीएतील ही शिबिर 17 ऑगस्टपासून सुरू होईल. गोव्यासाठी प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून खेळताना अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक केले. त्याने 223 धावा केल्या व एकूण 12 विकेट्स घेतल्या. मोहित रेडकरने पहिल्याच हंगामात 238 धावा ठोकताना आपल्या ऑफ-स्पिनने 19 विकेट्सही मिळविल्या.यावर्षी उदयोन्मुख क्रिकेटपटूंची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा (23 वर्षाखालील) होणार आहे. बीसीसीआयकडून युवा क्रिकेटपटूंची चाचपणी सुरू आहे. एनसीएचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या संकल्पनेतून अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटच्या कसोटी, वनडे आणि टी-20 या तीनही फॉर्मेटमध्ये यशस्वी ठरतील असे कौशल्यपूर्ण अष्टपैलू क्रिकेटपटू घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
शिवसुंदर दासच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय वरिष्ठ निवड समितीने कामगिरी आणि प्रतिभा या दोन्हीचा विचार करून या शिबिरासाठी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. ‘या शिबिरासाठी निवड झालेला प्रत्येक क्रिकेटपटू अष्टपैलू नाही. काही खेळाडू प्रामुख्याने फलंदाज किंवा गोलंदाज असून अन्य विभागांतही योगदान देण्याची त्यांची क्षमता आहे. त्यांच्यातील गुण हेरूनच त्यांना मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांची वरिष्ठ संघापर्यंतची वाटचाल थोडी सोपी होऊ शकेल, असेही सुत्राने सांगितले. सौराष्ट्राचा चेतन साकारिया आणि पंजाबचा अभिषेक शर्मा यांचीही या शिबिरासाठी निवड झाली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असणाऱ्या चेतनने यापूर्वी भारताकडून वनडे व दोन टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये चेतनने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधीत्व केले. डावखुरा फलंदाज आणि फिरकीपटू अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून चांगली कामगिरी केली. गोव्याचा मोहित रेडकर, राजस्थानचा मानव सुथार, दिल्लीचा हर्षित राणा व दिवीज मेहरा यांनाही त्यांच्यातील अष्टपैलूत्वाचे गुण हेरून शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे.









