वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा 1-3 असा पराभव आणि ड्रेसिंग रुममधील चर्चा लीक झाल्यानंतर बीसीसीआयने तीन कोचिंग स्टाफ सदस्यांना काढून टाकले आहे. सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसह क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांचा समावेश आहे. तथापि, बीसीसीआयने याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायरच्या जागी कोणालाही नियुक्त केले जाणार नाही, कारण सीतांशु कोटक आधीच टीम इंडियाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेले आहेत. दिलीपचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट पाहतील. ट्रेनर सोहम देसाईची जागा एड्रियन ली रु घेईल, जो सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसोबत आहे. तो 2008 ते 2019 पर्यंत केकेआर संघासोबत होता, त्याने 2002 ते 2003 पर्यंत टीम इंडियासोबतही काम केले. त्याने बीसीसीआयसोबत करार केला आहे. दिलीप आणि सोहम तीन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघासोबत होते. तर, अभिषेक नायर 8 महिन्यांपूर्वीच संघात सामील झाले होते. सध्या ट्रेनिंग असिस्टेंट राघवेंद्र, दयानंद गरानी, फिजियोथेरेपिस्ट कमलेश जैन, मसाजर अरुण कनाडे, चेतन कुमार, राजीव कुमार, टीम ऑपरेशन्सचे मॅनेजर सुमित मल्लापुरकर, एक सिक्योरिटी मॅनेजरसह अनेक लोक टीम इंडियाचे सपोर्ट स्टाफ म्हणून काम करत आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अपयशानंतर बीसीसीआयची कारवाई
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर बीजीटी दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर तसेच चुकीच्या शॉट निवडीबद्दलही गंभीरने नाराजी व्यक्त केली होती. कोणाचेही नाव न घेता तो म्हणाला की, नैसर्गिक खेळ खेळण्याचे निमित्त करणाऱ्या खेळाडूंना परिस्थितीनुसार खेळावे लागेल. गंभीरचे हे विधान लीक झाले. त्यानंतर गंभीरने म्हटले होते की खेळाडू आणि प्रशिक्षकांमधील संभाषण फक्त ड्रेसिंग रूमपुरते मर्यादित असले पाहिजे. ते बाहेर येऊ नये. ड्रेसिंग रुममध्ये तणाव असल्याच्या बातम्या गंभीरनेही फेटाळून लावल्या होत्या. यानंतर संघात सर्व काही ठीक नसल्याची अटकळ बांधली जात होती. याला दुजोरा मिळाला असून अभिषेक नायरसह तिघांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे समजते.
केंद्रीय करारातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता
आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची बैठक झाली. यावेळी केंद्रीय कराराबद्दल सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर दोन दिवसांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाचे करार जाहीर करण्यात आले. पण पुरुष संघाचे करार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष संघाच्या केंद्रीय करारात मोठे बदल दिसून येऊ शकतात. यामुळे, काही मोठी नावे वगळली जाऊ शकतात. त्याच वेळी, आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय केंद्रीय कराराची घोषणा करू शकते.









